जेव्हा मराठी अभिनेत्रीच्या लेकीला विराटने दिलेलं स्पेशल सरप्राईज ; "तो खरंच खूप गोड आणि नम्र.."
esakal April 18, 2025 06:45 PM

Marathi Entertainment News : मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री शुभांगी लाटकर यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते क्रिकेटर विराट कोहलीपर्यंत त्यांनी अनेक कलाकारांबरोबर जाहिरातीत काम केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी विराट बरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.

शुभांगी यांनी नुकतीच बी रेडी ओके या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांचे अनेक अनुभव शेअर केले. यावेळी विराटने त्यांच्या मुलीला कसं सरप्राईज दिलं हे त्यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या,"तो खूपच नम्र आणि सहकार्य करणार होता. आम्ही खूप गप्पा मारल्या. मी क्रिकेटची शौकीन नाही आणि मला क्रिकेटबद्दल फार माहिती नाही किंवा समजतही नाही. पण जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं की उद्या मी विराट कोहलीबरोबर जाहिरात करतेय तेव्हा माझी मुलगी खूप खुश झाली." त्यांच्या मुलीचं नाव यशोदा आहे.

"मी तिला सांगताच ती म्हणाली की, 'तुला कळतंय का आई, तू कोणाबरोबर जाहिरात करतेयस ?' ही गोष्ट जेव्हा मी विराटला सांगितली की, माझी मुलगी त्याची खूप मोठी फॅन आहे. मी तिला फोन लावला पण तिने तो उचलला नाही. मी त्याला सांगितलं की, ती आता फोनवर नाहीये. ती कदाचित कॉलेजमध्ये असेल. तर त्याने मला व्हॉइसनोट रेकॉर्ड करायला सांगितलं. रेकॉर्ड केल्यावर तो म्हणाला की, हे तुमच्या मुलीला पाठवा."

पुढे त्याने सांगितलं की,"त्याने त्या व्हॉइसनोटमध्ये म्हटलं होतं की, हाय यशोदा मी विराट, मला समजलं की तू माझ्या फॅन आहेस वगैरे..खरंच इतका गोड माणूस आहे तो म्हणजे इतकं कोण करतं कोणासाठी ? यशोदा त्यानंतर वेडी व्हायची शिल्लक होती."

याशिवाय जेव्हा त्यांना विराटने उचलण्याचा शॉट होता तेव्हा त्याने स्पष्ट केलं की हा शॉट तो एकदाच करेल. त्यासाठी त्याने दोन किंवा तीन कॅमेरे लावण्याची विनंती केली. तो अत्यंत प्रोफेशनल असून त्याचं मुख्य काम क्रिकेट खेळणं आहे याची त्याला जाणीव आहे आणि स्वतःला दुखापत होऊ नये म्हणूनच त्याने ही अट घातल्याचं त्यांनी सांगितलं.

शुभांगी यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनुबंध, संयुक्त, मन धागा धागा जोडते नवा, अबीर गुलाल या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.