आयपीएलच्या 18 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सला अजून काही खास करता आलेलं नाही. तसेच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे चेन्नईच्या अडचणीत वाढ झालीय. ऋतुराजला बाहेर व्हावं लागल्याने मुंबईकर 17 वर्षीय ऑलराउंडर आयुष म्हात्रे याचा संघात समावेश केला. तर महेंद्रसिंह धोनी याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र धोनीलाही कर्णधार म्हणून खास काही करता आलेलं नाही. आयपीएल स्पर्धेत एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईला 18 व्या हंगामात 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे.
मुंबईला पराभूत करुन विजयी सलामी देणाऱ्या चेन्नईला आणखी एक मोठा झटका लागला आहे. ऋतुराजनंतर आणखी एका खेळाडूला या संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे. चेन्नईच्या गुरजनप्रीत सिंह याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच सीएसके टीम मॅनजेंटने गुरजनप्रीत सिंह याच्या जागी बदली खेळाडूचं नावही जाहीर केलं आहे.
चेन्नईने स्फोटक फलंदाज आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिस याचा समावेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. चेन्नईने ब्रेव्हिसला 2 कोटी 20 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
डेवाल्ड ब्रेव्हिस आणि एबी डीव्हीलियर्स या दोघांच्या खेळण्यात साम्य आहे. त्यामुळे डेवाल्डला बेबी एबी असंही म्हटलं जातं. या 21 वर्षीय युवा आणि स्फोटक फलंदाजाला आयपीएलचा फारसा अनुभव नाही. डेवाल्डने आयपीएलमध्ये एकूण 10 सामने खेळले आहेत. डेवाल्डने 10 सामन्यांमध्ये 16 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने 230 धावा केल्या आहेत. तसेच डेवाल्डची 49 ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, डेवाल्ड ब्रेव्हीस, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.