मुंबई : महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते. या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आता राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याची माहिती आहे. याच दरम्यान काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये दिले जातील अशी बातमी पुढं आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ मिळतो. त्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये देण्यात आले आहेत.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना डीबीटी द्वारे कमाल 18000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवण्याचे निर्णय घेतला होता. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये 12000 रुपये मिळतील. उरलेल्या सहा हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे दोन शास निर्णय काढले होते. त्याला अनुसरुनचं महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत. निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून योजनेच्या जीआरमध्ये ज्या अटी होत्या त्यांची अंमलबजावणी केली जात आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारची भूमिका मांडली होती. त्यामध्ये त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये देण्यात येत आहेत अशी घोषणा केली. आदिती तटकरे यांच्या ट्विटनुसार या महिलांची संख्या 774148 इतकी आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळतील. उर्वरित पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
अधिक पाहा..