अंबड : जालना -अंबड महामार्गावरील मठपिंपळगाव शिवारात गुटख्याचा ट्रक पकडून तब्बल ६४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांना माहिती मिळाली की जालना-अंबड महामार्गावरुन ट्रकमधून क्र. (एम.एच.४ डी. के.७१०७) प्रतिबंधित केलेला गुटखा नेला जात आहे.
याबाबतची माहिती त्यांनी बुधवारी (ता.१६) रात्री गस्तीवरील सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले, पोलिस कॉन्स्टेबल मुंढे यांना दिली. त्यानंतर प्रभारी अधिकारी बारवाल यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण, साठेवाड, गावडे, चव्हाण यांचे पथक तालुक्यातील मठपिंपळगांव शिवारात पोहोचले.
यावेळी त्यांनी भारत पेट्रोलपंपाजवळ सापळा लावला. यावेळी संशयित ट्रक रात्री ११.३० वाजता पकडला. चौकशी ट्रक चालकाचे आपले नाव यशवंत गुणाजी जरे, (रा.अंमळनेर, ता. पाटोदा जि. बीड) असे सांगितले.
पोलिसांनी ट्रक अंबड पोलिस ठाण्यात आणून दोन पंचासमक्ष पंचनामा केला. सदर ट्रक व त्यातील गुटखा मिळुन ६४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गुरूवारी (ता.१७) जालना येथील अन्न व औषध प्रशासनाशी पत्र व्यवहार केल्यानंतर जालना येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रशांत अंजिठेकर यांनी पाहणी करुन चालकावर अंबड ठाण्यात गुन्हा दाखल केला.