दहिवडी : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बळकट करण्याच्या दृष्टीने आज हा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विकासात्मक तसेच राजकीय बळ देण्यात येईल, याची हमी देतो, असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील (Nitin Patil) यांनी केले. अनिल देसाई (Anil Desai) यांनी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार पाटील बोलत होते.
यावेळी माण तालुकाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण, जालिंदर खरात, लक्ष्मण सूर्यवंशी, बाळासाहेब कदम, रफीक मुलाणी, दाजीराम पवार, समीर ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी काम करत आला आहे. त्याच विचारांचे सर्व कार्यकर्ते एकत्र करून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून मी आज अनिल देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकमेकांची भूमिका समजून घेतल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे.’’
देसाई म्हणाले, ‘‘पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासंदर्भात आजची बैठक होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पद्धत मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून ते देतील त्या तारखेला आम्ही जाहीर प्रवेश करणार आहोत. आम्ही सर्व मिळून माण तालुका राष्ट्रवादीमय केल्याशिवाय राहणार नाही.’’ यावेळी माण तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मध्यंतरी काही स्थित्यंतरे झाली. त्यामुळे पक्षात विस्कळितपणा आला; पण कार्यकर्ते एका ठिकाणी यावेत, बांधले जावेत, अशीच आमची भूमिका आहे. बेरजेचे राजकारण करायचं, हा यशवंतराव चव्हाण यांचा मंत्र आहे. त्यानुसार आम्ही बेरजेचं राजकारण करू.
- नितीन पाटील, खासदार