Ranjit Kasale: रणजित कासलेंविरोधात मोठी कारवाई, पोलिस सेवेतून बडतर्फ
Saam TV April 18, 2025 09:45 PM

बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रणजित कासले यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. बीडच्या सायबर विभागात ते कार्यरत होते. रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत धनंजय मुंडे, बीडचे पोलिस खात्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रणजित कासले यांना आज पहाटे पुण्यातून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे आतापर्यंत नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये रणजीत कासले यांनी पोलिस खात्यावरती आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आहेत.

त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. बीड पोलिसांनी आज सकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरोधात बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.

१७ एप्रिल २०२५ रोजी सक्षम अधिकारी, छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्राचे माननीय पोलिस महानिरीक्षक यांनी भारतीय संविधानाच्या कलम ३११(२) (ब) अंतर्गत रणजित कासले यांना बडतर्फ केले आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी बीड पोलिसांनी त्यांना एससी/एसटी कायद्याच्या कलम ३(१)(आर) अंतर्गत शिवाजीनगर पोलिस स्टेशन, बीड येथे नोंदवलेल्या गुन्ह्या क्रमांक २१३/२५ संबंधी अटक केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.