500 रुपयांना एक केळं, 2100 रुपयांना बर्गर, ‘या’ विमानतळावरील खाद्यपदार्थांची किंमत ऐकून तुम्हीही हादराल
GH News April 18, 2025 10:12 PM

अनेकदा विमानतळांवर खाद्यपदार्थांच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या नसतात. विमानतळावर खाद्यपदार्थ महाग असणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण तुर्कीमधील इस्तांबूल विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या किंमती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. इस्तांबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत तब्बल ५६५ रुपये असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या विमानतळावर एका बर्गरसाठी २१०० रुपये मोजावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. या किमतींमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिरर यूकेच्या एका रिपोर्टनुसार, इस्तंबूल विमानतळावर खाद्यपदार्थांचे दर खूप जास्त आहे. यामुळे काही प्रवाशांनी याबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. या विमानतळावर अगदी मूलभूत गोष्टींसाठीही प्रीमियम दर आकारले जात आहेत. इस्तंबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत ५ पाउंड्स (जवळपास ५६५ रुपये) आहे. तर बर्गरची किंमत २१०० रुपये इतकी आहे. पण बिअर मात्र १७०० रुपयांना मिळत आहे.

तर इटलीतील ‘कोरिएरे डेला सेरा’ या वृत्तपत्राने एका इटालियन लेखकाच्या अनुभवाचा हवाला देत या विमानतळावरील किमतींच्या मनमानी कारभारावर भाष्य केले आहे. इस्तंबूल विमानतळावर केवळ केळी आणि बर्गरच नव्हे, तर लझानियासारख्या सामान्य पदार्थांची किंमतही खूप जास्त आहे. या पदार्थाची किंमत जास्त असली तरी त्याची गुणवत्ता अत्यंत निराशाजनक आहे. मला या ९० ग्रॅम लझानियासाठी २१ पाउंड्स (जवळपास २,३७७.९७ रुपये) मोजावे लागले.

“मला तो लझानिया एखाद्या विटेच्या तुकड्याप्रमाणे दिसत होता, ज्यावर थोडंसं किसलेलं चीज आणि तुळशीची पाने टाकली होती. त्याची चव आणि गुणवत्ता किंमतीपेक्षा कितीतरी पट वाईट होती”, असे त्यांनी म्हटले.

प्रवाशांची लूटमार

युरोपमधील सर्वात महागडे विमानतळ म्हणून इस्तंबूल विमानतळाची ओळख होत आहे. त्यामुळे या विमानतळावर प्रवास करणे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. या विमानतळावरुन दररोज सुमारे २ लाख २० हजार प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूटमार होत आहे.

या पदार्थांच्या किंमतीवरुन सोशल मीडियावरही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर एका युजरने कमेंट करत टीका केली आहे. “त्या केळ्यावर सोन्याचा मुलामा चढवला होता का की काय जेणेकरून त्याची किंमत १०० पटीने वाढेल.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करताना म्हटलं की “आता केळं फळांचा राजा नाही, तर थेट बादशाह बनला आहे.” तर एकाने “अशा किंमती असतील तर प्रवाशांना उपाशी राहावे लागेल.” असे म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.