नवी दिल्ली : ‘‘नॅशनल हेराल्डच्या दोन हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कब्जा केला आहे’’ असा आरोप भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरम्यान, गांधी कुटुंबीयाने नॅशनल हेराल्डच्या माध्यमातून सार्वजनिक पैशाची लूट केली असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या २४, अकबर रोड कार्यालयाजवळ आंदोलन केले.
‘‘काँग्रेस पक्ष सदैव भ्रष्टाचारात गुंतलेला असतो. नॅशनल हेराल्ड हे त्याचे ठळक उदाहरण आहे,’’ असे ठाकूर म्हणाले. ‘‘विविध राज्यातील काँग्रेस सरकारांनी नॅशनल हेराल्डला जाहिराती देण्यासाठी जनतेचे पैसे उधळले. आता नॅशनल हेराल्ड हे नाव ऐकले तरी काँग्रेसच्या पूर्ण परिसंस्थेला धडकी भरते. कारण हे लोक पकडले गेले आहे. काँग्रेसने नॅशनल हेराल्डचा वापर ‘एटीएम’च्या स्वरूपात केला. गांधी कुटुंबाने खिशातून एक रुपयाही न देता नॅशनल हेराल्डची दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती कब्जात घेतली आहे,’’ असा आरोप ठाकूर यांनी केला.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या कारवाईमागे कोणतेही राजकारण नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, यंग इंडिया कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ७६ टक्क्यांची हिस्सेदारी आहे. या कंपनीने काँग्रेसशी संबंधित असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे (एजेएल) अधिग्रहण केले. एजेएलवर काँग्रेसचे ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. या सर्व व्यवहारांचा तपशील काँग्रेसने दिला पाहिजे. एखादा राजकीय पक्ष कर्जाचे वाटप करू शकतो का? याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले पाहिजे, अशी मागणीही ठाकूर यांनी केली. ‘‘काँग्रेस नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयाला लवकर सुनावणी घेण्याची मागणी करावी. ’’असे आव्हान ठाकूर यांनी दिले.
‘ईडीच्या तपासात हस्तक्षेप नाही’‘‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामिनाशिवाय अन्य कोणतीही सवलत मिळालेली नाही. न्यायपालिकेने ‘ईडी’च्या तपासात कुठेही हस्तक्षेप केलेला नाही,’’ असे भाजपचे नेते अनुराग ठाकूर म्हणाले. हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर टीका करताना ठाकूर म्हणाले की, काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. ‘‘नॅशनल हेराल्डवर कोट्यवधी का खर्च करण्यात आले? याचे उत्तर सुक्खू सरकारने दिले पाहिजे. हिमाचलमधला काँग्रेसचा एखादा नेता तरी नॅशनल हेराल्ड वाचतो का? हाही प्रश्न आहे,’’ असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.