स्वतःवरची एक 'गुंतवणूक'
esakal April 19, 2025 09:45 AM

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

वैयक्तिक वाढ आणि आपला वैयक्तिक विकास, या दोन्ही गोष्टी एक संतुलित आणि प्रगतिशील आयुष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात; पण वैयक्तिक वाढ, ज्याला आपण इंग्रजीत ‘personal growth’ असे म्हणतो, म्हणजे नक्की काय? आणि ही growth नक्की कशी दिसते? तर आपण जेव्हा आपल्या स्वभावातले गुण-दोष स्वतः ओळखायला लागतो, आपल्या स्वभावातील गुणांना प्रबळ बनवण्यावर आणि दोषांना कमी करण्यावर भर देतो, आपल्या विचारांचे, भावनांचे योग्य नियोजन करायला शिकतो, आणि आपल्या प्रगतीसाठी नवीन उपयुक्त विचार, सवयी, आत्मसात करायला लागतो, तेव्हा आपली वैयक्तिक वाढ होते.

‘Personal Growth is a Journey, not a Destination’ म्हणजेच वैयक्तिक वाढ, वैयक्तिक विकास हा एक प्रवास आहे, एक निरंतर प्रक्रिया आहे आणि जर आपल्याला स्वतःमध्ये ‘ग्रोथ’ हवी असेल, तर स्वतःमध्ये ‘इन्व्हेस्टमेंट’ ही करावीच लागणार! मग साहजिकच हा प्रश्न येतो, की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे?

आर्थिक गुंतवणुकीचा एक मूलभूत नियम असतो, की आपल्या ‘assets’ना वाढवा आणि ‘liabilities’ना कमी करा. हेच धोरण, वैयक्तिक विकासासाठी देखील लागू पडते. स्वतःच्या ‘स्ट्रेंथ्स’ आणि ‘वीकनेस’बद्दल जागरूक राहून तुमच्या ‘स्ट्रेंथ्स’ (म्हणजेच तुमचे ॲसेट्स) वाढवण्यावर जास्त भर देणे आणि तुमच्या ‘वीकनेसे’सना (म्हणजेच तुमच्या ‘लायेबिलिटीज’) कमी करणे. त्यासाठी सर्वप्रथम ही जागरूकता हवी, की माझा स्वभाव काय आहे? माझ्या सवयी काय आहेत, माझ्या विचारांचा आणि भावनांचा पॅटर्न काय आहे? आणि हे स्वज्ञान, हे अंतर्ज्ञान मिळवण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे ‘Journaling’.

जर्नलिंग म्हणजे पर्सनल डायरी लिहिणे, एवढाच त्याचा सीमित अर्थ सामान्यतः घेतला जातो; पण जर्नलिंग हे एक साधन आहे, एक टूल आहे ज्याच्या मार्फत आपण अधिक जागरूक होऊ शकतो, self-aware होऊ शकतो आणि वैयक्तिक विकासासाठी स्वतःबद्दलची जागरूकता अनिवार्य असते. केवळ मानतील गोष्टी कागदावर लिहिणे म्हणजे जर्नलिंग नाही, तर योग्यरित्या आपले विचार, भावना, आपली मते, आपले अनुभव यांची अभिव्यक्ती, विश्लेषण आणि त्यातून होणारा आत्म-बोध, आणि याची योग्य पद्धतीने नोंद म्हणजे जर्नलिंग.

योग्य पद्धतीने जर्नलिंग केल्यास, आपले विचार, भावना आणि अनुभवांचे अन्वेषण आणि नियोजन करण्यासाठी जर्नलिंग हे एक शक्तिशाली साधन बानू शकते. आपली सर्जनशीलता, आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, मानसिक आरोग्य जपण्यासाठी, ताण कमी करण्यामध्ये, समस्यांचे निराकरण करण्यामध्ये, निर्णय सक्षमता वाढवण्यामध्ये, भविष्याचे योग्य नियोजन करण्यामध्ये जर्नलिंग एक सकारात्मक योगदान देऊ शकते

जर्नलिंगसाठीच्या काही टिप्स
  • जर्नलिंग करण्यासाठी तुम्ही डायरी, पेनचा वापर करू शकता, डिजिटल फॉरमॅटमध्येही करू शकता, किंवा आजकाल जर्नलिंग ॲप्सदेखील उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला सोयीस्कर असलेली पद्धत निवडा.

  • शक्य असेल तेवढे नियमितपणे जर्नलिंग करण्यावर भर द्या. मग ते दिवसातून एक वेळ असेल, आठवड्यातून तीन-चार दिवस असेल, जे काही तुम्हाला सूट होईल असे नियोजन करा.

  • त्या दिवशी निदान पंधरा ते वीस मिनिटे तरी नक्कीच यासाठी राखून ठेवा. हा तुमचा ‘me time’ आहे, अशा पद्धतीने त्याकडे बघा. छानशी कॉफी किंवा चहा बनवा, तुमच्या आवडत्या जागेमध्ये शांतपणे बसा, आणि त्या वेळेमध्ये स्वतः स्वतःचे ‘चांगले श्रोते’ बना.

  • सुरुवातीला काही दिवस फक्त लिहा. ‘मी काय लिहू, कसे लिहू?’ याचा फार विचार न करता आधी मुक्तपणे फक्त मानतील विचार, कागदावर उतरवा. कारण सहसा आपल्याला अशा लिखाणाची सवय नसते. म्हणून याची थोडी सवय होऊ द्या.

  • एकदा सवय झाली, की मग जर्नलिंगची पुढची स्टेप तुम्ही घेऊ शकाल. पुढची स्टेप म्हणजे, एक टॉपिक, एक विचार, एखादा अनुभव, एखादी घटना, एक उद्दिष्ट, अशा एखाद्या विशिष्ट गोष्टीसंबंधित जर्नलिंग. इथे आपल्या विचारांना आणि भावनांना थोडी दिशा देणेही महत्त्वाचे असते. मग ते कसे करायचे, तर स्वतःला योग्य प्रश्न विचारून, उदाहरणार्थ,

मला आत्ता काय वाटत आहे?
  • या परिस्थितीबद्दल माझे विचार काय आहेत?

  • या अनुभवातून मी काय शिकले?

  • आज मी कशासाठी कृतज्ञ आहे?

  • भविष्यासाठी माझी उद्दिष्टे कोणती आहेत?

  • त्यासाठी मी काय करायला पाहिजे?

  • माझ्या कोणत्या सवयी माझ्या यशामध्ये उपयुक्त ठरतात?

  • कोणत्या सवयी माझ्या यशामध्ये बाधा निर्माण करू शकतात?

अशा प्रकारे आपण स्वतःशी विधायक संवाद साधतो, त्यातून बोध घेतो आणि ते सकारात्मकपणे कृतीत आण्यासाठी आपल्या मनाशी काही ठरवतो, मनाचा निर्धार करतो, ते असते खरे जर्नलिंग.

एकदा का तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या विचारांना आणि भावनांना विधायक पद्धतीने मांडण्याची सवय झाली, की मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल, की जर्नलिंग म्हणजे आपला आंतरिक सल्लागार असतो, जो आपल्याला स्वज्ञान, अंतर्ज्ञान, सर्जनशीलता, आणि स्वतःच्या विकासासाठी सतत प्रेरित ठेवतो. तर अशी ही स्वतःवरची गुंतवणूक तुम्ही जरूर करून बघा. यात नुकसान नक्कीच नाही; पण फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.