नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शिक्षण क्षेत्रातील जातिभेद संपविण्यासाठी रोहित वेमुला कायदा तयार करावा असे आवाहन काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला केला आहे. यासाठी राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठविले असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचाही उल्लेख केला आहे.
राहुल गांधींनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठविल्याची आणि कर्नाटकमध्ये ‘रोहित वेमुला’ कायदा लागू करण्याचे आवाहन केल्याची माहिती दिली. तसेच, ‘‘बाबासाहेब आंबेडकरांपासून रोहित वेमुलापर्यंत आणि त्याच्यासारख्या अन्य कोट्यवधी लोकांना जो जातिभेद सहन करावा लागला तो देशातील इतर विद्यार्थ्यांना सहन करावा लागू नये,’’ अशी आग्रही भूमिकादेखील या पत्राद्वारे राहुल गांधींनी मांडली. अलीकडेच संसदेत दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थी, शिक्षकांशी झालेल्या भेटीदरम्यान महाविद्यालये, विद्यापीठांमधील जातिभेदाची माहिती मिळाल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी या पत्रात केला आहे.
‘कठोरपणे मुकाबला करण्याची वेळ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कशा प्रकारे जातिभेदाला तोंड द्यावे लागले होते त्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘अस्पृश्यतेमुळे लोकांनी त्यांना पाणी देण्यास नकार दिला होता. आंबेडकरांनाही तहान-भूक लागत असे पण अनेकदा त्यांना उपाशी झोपावे लागले होते. शाळेत त्यांना अन्य विद्यार्थ्यांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. त्यांना कोपऱ्यात एकाकी बसावे लागत होते. आंबेडकरांना जे सहन करावे लागले ते अतिशय लाजीरवाणे होते.
भारतात असे कोणासोबतही घडू नये. मात्र देशातील शिक्षण व्यवस्थेत दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायातील लाखो विद्यार्थ्यांना जातिभेदाला तोंड द्यावे लागते. रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांची हत्या मान्य केली जाऊ शकत नाही. याविरुद्ध कठोरपणे मुकाबला करण्याची वेळ आली आहे.