'गोकुळ'चं राजकारण ढवळून निघणार; अध्यक्षपदाच्या निवडीत कोण मारणार बाजी? विधानसभा-लोकसभेची गणिते चालणार का?
esakal April 19, 2025 07:45 PM

कोल्हापूर : ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा, ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ठरावांची जुळवजुळव आणि पुढील वर्षात होणारी निवडणूक (Gokul Dudh Sangh Election) यामुळे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) राजकारण आता ढवळून निघणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. मे मध्ये होणाऱ्या अध्यक्ष निवडीत (Gokul President Election) विद्यमान कायम राहणार की बदलणार यावरच निवडणुकीची पेरणी ठरणार आहे.

विधानसभा आणि लोकसभेचे राजकारण वेगळे आणि सहकारातील राजकारण वेगळे आहे. जे नेते विधानसभा आणि लोकसभेत समोरासमोर विरोधात होते, त्यांची गट्टी सहकारात मात्र कायम आहे. त्यामुळे विधानसभा- लोकसभेची गणिते येथे चालणार नाहीत. दोन-दोन आणि एक अशा वर्षात ‘’च्या अध्यक्षपदाची विभागणी ठरली असली तरीही नूतन अध्यक्ष निवड तितकी सोपी नाही. सहकारातील नियमानुसार पंधरा सप्टेंबरपूर्वी विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी लागते.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विरोधकांना थोपवून धरण्याची ताकद असणारा अध्यक्ष आवश्यक आहे. कारण याच सर्वसाधारण सभेनंतर थेट निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तातडीने ठरावांची जुळवाजुळव सुरू होणार आहे. याच ठरावावर निवडणुकीतील मतदानाचे गणित अवलंबून असते. साधारण जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणूक होईल. त्यामुळे आगामी अध्यक्ष सक्षम असणे आवश्यक आहे.

‘गोकुळ’ची सत्ता कायम ठेवायची असेल तर अध्यक्षपदावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असल्याचे दिसून येते. अध्यक्षपदाची पहिली दोन वर्षे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांना मिळाली. त्यानंतर पुढील दोन वर्षे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत गोकुळची कमान उंचच राहिली आहे.

पुढील वर्षासाठी कोणत्या नेत्याकडून कोणता चेहरा पुढे येणार, यामध्ये सध्याच्या एकीला नख लागले तर मात्र राजकारणाची दिशाच बदलू शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदलासाठी राजकारण झाले तर त्याचे पडसाद थेट पंचवार्षिक निवडणुकीवर होऊ शकतात. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नसले तरीही निवडणुकीच्या तोंडावर बदलाचे राजकारण सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते.

'गोकुळ'मध्ये काय घडले...
  • उत्पादकांच्या दूध दरात वाढ

  • दूध संस्थांच्या सचिवांचे मानधन वाढवले.

  • कर्मचाऱ्यांना बोनस दिला.

  • पेट्रोल पंप सुरू झाला.

  • सोलर सिस्टीममुळे वीज खर्च वाचला.

  • दूध पावडर परदेशात पाठवण्यात आली.

ठळक मुद्दे
  • पंधरा सप्टेंबरपूर्वी होणारी सर्वसाधारण सभा

  • निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्यासाठी होणार धावपळ

  • अध्यक्ष बदलाचा थेट निवडणुकीवर होणारा परिणाम

  • सत्ताधाऱ्यांची एकजूट अध्यक्ष निवडीत दिसणार

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.