मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 2 यशस्वी संघ आहेत. मात्र या दोन्ही संघांना आयपीएल2025 मध्ये काही खास करता आलेलं नाही. दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी 7-7 सामने खेळले आहेत. मुंबईने 3 तर चेन्नईने 2 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ आपल्या लौकीकाला शोभणारी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. आता रविवारी 20 एप्रिलला मंबई विरुद्ध चेन्नई सामना होणार आहे. त्याआधी चेन्नईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यानंतर चेन्नईला आणखी एक मोठा झटका लागला आहे.
ऋतुराज गायकवाडनंतर चेन्नईच्या आणखी एका खेळाडूला दुखापत भोवली आहे. चेन्नईचा गुरनजप्रीत सिंह याला दुखापतीमुळे संपू्र्ण मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला सीएसकेने गुरजनप्रीत याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेशही केला आहे.
गुरजनप्रीत सिंह याच्या जागी ‘बेबी एबी’ या नावाने ओळखला जाणारा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईने डेवाल्ड ब्रेव्हीसला 2 कोटी 20 लाख रुपयात करारबद्ध केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने आतापर्यंत 81 टी 20 सामने खेळले आहेत. डेवाल्ड ब्रेव्हीसची 162 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच डेवाल्ड ब्रेव्हीस याने एकूण 1 हजार 787 धावा केल्या आहेत.
डेवाल्ड ब्रेव्हीस याने 2023 साली टी 20i क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. डेवाल्डने आतापर्यंत फक्त 2 टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मुंबईसाठी खेळलेला खेळाडू चेन्नईच्या गोटात
डेवाल्डने याआधी आयपीएलमध्ये 10 सामने खेळले आहेत. डेवाल्डने मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधत्व केलं आहे. डेवाल्डने 2022 साली 7 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 161 धावा केल्या आहेत. तर डेवाल्डने 2024 साली 3 सामने खेळले. मात्र डेवाल्डला 2023 साली एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. डेवाल्डने या 3 सामन्यांमध्ये 69 धावा केल्या. डेवाल्डने अशाप्रकारे एकूण 10 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 230 धावा केल्या. आता डेवाल्डला चेन्नईकडून खेळण्याची किती संधी दिली जाते आणि तो या संधीचा किती फायदा घेतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.