Sushma Andhare doubts about Raj Thackeray coming with Uddhav Thackeray
Marathi April 19, 2025 09:35 PM


(Thackeray brother) मुंबई : राज्यातील राजकारणातील अनिश्चितता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मोठे बंधू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तथापि, या सर्व घडामोडींबाबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना साशंकता वाटत आहे. हे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी दोघांचे एकत्र येणे असेल की, भाजपाचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी असेल, हा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. (Sushma Andhare doubts about Raj Thackeray coming with Uddhav Thackeray)

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी देण्याबद्दल टिप्पणी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी केला असता, राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.

भारतीय कामगार सेना 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी त्याला अनुकूल प्रतिसाद देतानाच याबाबतची आपली भूमिकाही स्पष्ट केली. आधी पाठिंबा द्यायचा, नंतर विरोध करायचा; मग परत तडजोड करायची, असे चालणार नाही. सर्वात पहिले महाराष्ट्राचे हित पहिले. मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याबाबत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या हितासमोर कोणाच्या महत्त्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, हे राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य मला तंतोतंत पटते. उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ कुटुंब म्हणून एकत्र राहिले पाहिजेत. काठी मारल्याने पाणी विभागले जात नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे हित आणि अस्मिता जोपासण्यासाठी हे भाऊ एकत्र येत असतील महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला आवडेलच. पण ज्याने महाराष्ट्राची अस्मिता कायम पायदळी तुडवण्याचे राजकारण केले, महापुरुषांचा अपमान केला, राज्यातील उद्योग गुजरातला पळविले, राज्यातील प्रादेशिक पक्षांना नख लावण्याचा प्रयत्न केला, त्या भाजपाच्या विरोधात बिगुल वाजवून विचारांची स्पष्टता ठेवत, स्वतंत्र अस्मिेचे राजकारण करण्यासाठी राज ठाकरे सिद्ध होणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा…; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर काय म्हणाले राऊत?





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.