Ramdas Athawale: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या राज ठाकरे यांच्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानांनंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा चालू झाली आहे. तर दुसरीकडे पवार घराण्यातील नेते तथा आमदार रोहित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याची साद घातली आहे. सध्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेले असतानाच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडी बरखास करावी, आणि रिपब्लिकन ऐक्य साधावे असे थेट आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अध्यक्ष व्हावे. त्यांनी वंचित आघाडी बरखास्त करावी. त्यांनी बाबासाहे आंबेडकर यांचा पक्ष चालवावा. त्याला आमचा पाठिंबा असेल. माझा पक्ष लवकरच अमिरेकतही जाणार आहे. तिथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पश (गवई गट) हादेखील एक पर्याय आहे,” अशी थेट ऑफरच रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.
तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्य घडवावे. या ऐक्यासाठी प्रयत्न करावे. त्यालाही आमचा पाठिंबा आहे. हे सगळे एकत्र आले तर समाजाची ताकद वाढेल, अशी भावनाही रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाला भाजपाने चार ते पाच जागा द्याव्यात, अशी मागणी केली. तसेच लोकसभा निवडणुकीत मला शिर्डी हा मतदारसंघ द्यायला हवा होता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेतृत्व करण्यासाठी कार्यक्षम नेते नाहीत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस वाढणार नाही, असे थेट मत त्यांनी काँगेसवर बोलताना व्यक्त केले.
लाडकी बहीण योजनेला पुरवल्या जाणाऱ्या निधीवरही त्यांनी भाष्य केलं. “अंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत व्हावी अशी आमची भूमिका आहे. राज्य सरकारने एक लाख रुपयांची मदत द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. सामजिक न्याय विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळविले असतील तर ते चुकीचे आहे,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच याबाबत मी माहिती घेतो असे म्हणत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. हा निधी वळविला जाऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.