वाढत्या उन्हामुळे फळांचे दर वाढले
esakal April 20, 2025 04:45 AM

वाढत्या उन्हामुळे फळांचे दर वाढले
उत्पादन घटल्याने रानमेवा घेणे झाले मुश्कील
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) ः वाढत्या उन्हामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, डाळिंब, मोसंबी आणि लिंबांना मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे; मात्र पपईची मागणी घटल्याने त्याचे दर दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. तर रानमेव्याला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते; मात्र त्याच्या उत्पादनात घट झाल्याने किमतीमध्ये वाढ झाली आहे.
अंगाची लाही कमी करण्यासाठी आईस्क्रिम पार्लर, ज्यूस, रसवंतीगृह आदी ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खरबूज, टरबूज, शहाळे, उन्हाळी काकडी या थंडावा देणाऱ्या उन्हाळी फळांना मागणी वाढू लागली आहे. औषधी दुकानातून ग्लुकोज साखरच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शहाळ्याचे पाणी पिणे व मलईदार खोबरे खाण्यासाठी नागरिकांची फळविक्रेत्यांकडे गर्दी वाढू लागली आहे. शहाळे पौष्टिक व आरोग्यदायक असल्याने त्याला सतत मागणी असते; मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेबरोबरच शहाळे, कलिंगड, खरबूज यांच्या दराची वाटचाल तेजीकडे चालू आहे. सफरचंद, चिकू, अननस, पेरू, स्ट्रॉबेरी, बोरे, संत्रे आणि द्राक्षांचे दर मात्र स्थिर आहेत. स्ट्रॉबेरीचीही आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर लिंबांना ज्यूसविक्रेते आणि रसवंतीगृहांकडून मागणी वाढली असल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्यात मिळणारा रानमेवा म्हणजेच जांभूळ, करवंद, रांजणेही बाजारात आली आहे; मात्र त्यांचे दर सामान्यांच्या खिशाला चाट देणारे आहेत. अलिबागचे प्रसिद्ध ताडगोळे विक्रीसाठी दाखल झाले असून १०० रुपयांना आठ ते नऊ ताडगोळे देण्यात येत आहेत.
...................
चौकट :
फुलांची आवक घटली
फूलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या आवकसह मागणीही घटली आहे. त्यामुळे गुलछडीवगळता सर्वच फुलांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी घटले आहेत. सध्या उत्सवांमुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती; मात्र त्यानंतर मागणी घटली आहे. उन्हाचे दिवस असल्याने फुलेही लवकर खराब होत असल्याने सकाळी आणलेली फुले जर विकली गेली नाहीत तर सायंकाळपर्यंत ती कोमेजतात. त्यामुळे फूलविक्रेत्यांचेही नुकसान होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.