Raigad News : शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर, पोटच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा अंत; समुद्रानं केलं गिळंकृत
Saam TV April 20, 2025 05:45 AM

रायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणाची नावे मयुरेश पाटील (वय २३), हिमांशू पाटील (वय २१) आणि अवधूत पाटील (वय २६) असल्याची माहिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस यांच्यावर आज शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांसह नातेवाईकातील एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोटच्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दु:खाचं डोंगरच कोसळला आहे. हे ऐकून कुटुंबासह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नेमकं काय झालं, हे ही अनेकांना माहित नव्हतं. या आघातानं कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.

संतोष पाटील यांचा मुलगा अवधूत संतोष पाटील आणि मयुरेश संतोष पाटील हे दोघे आणि त्यांचा मित्र हिमांशू पाटील हे तिघेही आज सकाळी वेळास तालुका श्रीवर्धन या बीचवर पोहून येतो असं आई-वडिलांना सांगून सुमुद्रावर गेले, ते तिघेही परत आलेच नाही. ही दुदैर्वी घटना सकाळी १०.३०च्या दरम्यान घडल्याचं दिघी सागरीच्या सूत्रांनी सांगितलं.

१२ वाजण्याच्या दरम्यान ते मुंबईला जाणार होते, म्हणून अवधूत आणि मयुरेश हे दोघेही समुद्रातून बाहेर आले. मात्र, हिमांशू आद्याप का आला नाही हे बघण्यासाठी दोघेही भाऊ पुन्हा समुद्रात गेले असताना हिमांशू बुडताना दिसला. त्याला वाचवण्यासाठी दोन्ही भावांनी तात्काळ समुद्रात उड्या घेऊन हिमांशूला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.