ऑनलाइन बुकिंगचा फ्रॉड
esakal April 21, 2025 09:45 AM

ॲड. शिरीष देशपांडे - संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

आजकाल प्रवासाला जायचे असले किंवा एखाद्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करायची असली, तर बहुतांश लोक अक्षरशः एका क्लिकवर मोबाईल, लॅपटॉपवरून ऑनलाइन माहिती मिळवून, आपल्याला अपेक्षित माहिती मिळाल्यानंतर तत्काळ रेल्वे, बस, विमानाचे तिकीट, हॉटेल किंवा भक्तनिवासातील राहण्याचे आरक्षण करून टाकतात. अनेकदा या वेबसाइट अधिकृत आहेत का? हे तपासून पाहिले जात नाही. त्यामुळे बोगस वेबसाइटवर जाऊन बुकिंग केले जाते आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. सायबर चोरट्यांनी अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

सायबर चोरटे प्रसिद्ध भक्त निवासाच्या किंवा हॉटेलच्या नावाने बनावट वेबसाइट बनवतात. यातील फोटो, संपर्क क्रमांक मूळ वेबसाइटप्रमाणेच असतात. मात्र, नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असतो किंवा तत्काळ बुकिंग देण्याचे किंवा भरपूर सवलत देण्याचे आमिष दाखवले जाते. याला लोक बळी पडतात आणि पैसे गमावून बसतात. नुकत्याच अशा काही घटना उघडकीस आल्या आहेत.

भक्तनिवासाचे बुकिंग

अनेकजण विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी तिथल्या भक्तनिवासांमधील राहण्याच्या सुविधेसाठी पूर्वनोंदणी करण्यासाठी वेबसाइटला भेट देतात आणि त्यावरून नोंदणी करतात. मात्र, अशा प्रसिद्ध ठिकाणांच्या बोगस वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. पुण्यातील एका भाविकाने शेगावला जाण्यासाठी गुगलवर संबंधित भक्त निवासासाठी ऑनलाइन शोध घेतला. तेव्हा त्याला भक्तनिवासाची वेबसाइट दिसली. ती अधिकृत आहे का, याची खात्री न करताच त्याने बुकिंग केले आणि सांगितलेल्या खात्यात साडे तीन हजार रुपये भरले. वेबसाइटवर भक्तनिवासाच्या नावातील स्पेलिंगमध्ये फरक होता, तो लक्षात आला नाही. त्यामुळे तिथे दिलेल्या खात्यात पैसे भरले. चोरट्यांनी पावतीदेखील पाठवली, त्यात अस्तित्वात नसलेल्या रूमचे क्रमांक होते. मात्र, प्रत्यक्षात भक्तनिवासात पोहोचल्यावर फसवणूक झाल्याचे समोर आले.

महाकुंभमेळ्यात फसवणूक

नुकत्याच प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात हॉटेल आणि खासगी निवासाच्या सुविधा देणाऱ्या बोगस वेबसाइटच्या माध्यमातून लाखो लोकांना फसवण्यात आले आहे. लवकरच नाशिक येथील २०२७ मधील कुंभमेळ्याच्या जाहिराती सुरू होतील आणि निराशा नको म्हणून अनेक लोक हॉटेल, खासगी निवास सुविधांचे बुकिंग करण्यासाठी घाई करतील, त्यांना जाळ्यात पकडण्यासाठी सायबर चोरटे सज्ज झाले असतील, त्यामुळे लोकांनी असे बुकिंग करताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

घ्यावयाची काळजी...
  • ज्या धार्मिक स्थळाला भेट देणार आहोत, त्यांची अधिकृत वेबसाइट असल्याची वारंवार खात्री करून मगच बुकिंग करावे. आपण वेळ देऊ शकत a अधिकृत एजंटामार्फत अर्ज करावा आणि पैसे भरावेत.

  • पैसे कोणत्या खात्यात भरण्यास सांगितले जात आहेत, ते कोणत्या नावाने आहे, ते अधिकृत नाव आहे का, याची खात्री करून घ्यावी.

  • भरमसाठ सवलती देणाऱ्या साइटवरून बुकिंग करण्यापूर्वी संबंधित हॉटेलचा खरा संपर्क क्रमांक शोधून चौकशी करावी.

  • बुकिंगपूर्वी संबंधित हॉटेल किंवा भक्तनिवासाचे ऑनलाइन अभिप्राय बघावेत.

  • शक्यतो क्रेडिट कार्डवरून पेमेंट करावे. काही गडबड झाल्यास संबंधित बँकेत तक्रार करता येते.

चूक घडल्यास...

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. १९३० या नंबरवर संपर्क साधावा. ही यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले आहेत, ती खाती गोठविण्याचे तातडीने प्रयत्न करते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.