चेन्नई सुपर किंग्सला रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. चेन्नईचा हा इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील सहावा पराभव आहे. पण असे असले तरी रविवारी चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेने सर्वांना प्रभावित केले.
मुंबईतील विरारमध्ये राहणाऱ्या आयुषला रविवारी चेन्नईने पदार्पणाची संधी दिली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात युवा खेळाडू ठरला.
जन्माने मुंबईकर असलेल्या आयुषने त्याचं घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत आक्रमक खेळ केला. त्याने पहिल्याच सामन्याच चेन्नईसाठी १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या. त्याने चेन्नईला पॉवरप्लेमध्ये चांगली गती मिळवून दिली होती. त्याला ७ व्या षटकात दीपक चाहरने मिचेल सँटेनरच्या हातून झेलबाद केले.
आयुषला चेन्नईसाठी खेळताना पाहून त्याच्या मात्र आनंदाश्रु रोखता आले नाहीत. तो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होता. त्याला आयुषला पाहून आनंदाने रडू येत होते. त्याचा आनंदाने रडतानाचा व्हिडिओही चेन्नईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत असून मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून पसंतीही मिळत आहे.
आयुषला साठी कोणीही खरेदी केले नव्हते. पण त्याने ट्रायल्समध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या स्काऊटला प्रभावित केले होते. त्यामुळे त्याला चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली.
या सामन्यात तो बाद झाल्यानंतर शिवम दुबेने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली, तर रवींद्र जडेजाने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने २० षटकात ५ बाद १७६ धावा केल्या आणि मुंबईसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले.
या लक्ष्याचा पाठलाग मुंबईने १५.४ षटकात पूर्ण केला. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली, ज्यात ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याबरोबर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले.