धनुषच्या चित्रपटाचा सेट आगीत जळून खाक
Marathi April 21, 2025 03:25 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष त्याच्या आगामी ‘इडली कडाई’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र चित्रपटाच्या सेटवर अचानक भीषण आग लागल्याने सेट जळून खाक झाला. दीड तासानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारणही अस्पष्ट आहे. तामीळनाडूतील थेनी जिह्यातील अंदिप या गावात त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यासाठी रस्ते, घरे आणि दुकानांचा एक मोठा सेट उभारण्यात आला होता.

आगीमुळे अभिनेत्यासह सर्वांचीच तारांबळ उडाली. सेट तयार करण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आहे. या सेटवरील शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आले होते. दुसऱ्या सेटवर शूटिंग करण्याआधीच या सेटला आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच स्थानिक मदतीला धावले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.