वरळी सी फेससारख्या वर्दळीच्या भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्री लागल्याच्या रागातून एका ३५ वर्षीय व्यक्तीने रागाच्या भरात महिलेच्या पाठीत धारदार काचेचा तुकडा खुपसला. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने मुंबईतील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ५ तासात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
५ तासात आरोपीला बेड्या ठोकल्या
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता बाळू पाटकर असे गंभीर झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वरळी सी फेसवरून जे के कपूर चौक या ठिकाणी जात होत्या. त्यांच्या हातात त्यावेळी छत्री होती. महिलेच्या हातातील छत्री एका व्यक्तीला लागली. यावरून तो व्यक्ती संतापला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने हातातील काच महिलेच्या पाठीत खुपसला. नंतर तेथून पळ काढला.
या प्रकरणाची माहिती जखमी महिलेच्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांकडे आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. अवघ्या ५ तासांच्या पोलिसांना आरोपी सापडला. आरोपी प्रेमनगर येथे असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेत आरोपी सचिन अवसरमोल याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.