Mahesh Manjrekar : "प्रेम, साथ आणि नात्याची गाठ..."; महेश मांजरेकर यांच्या 'देवमाणूस' चित्रपटाचे रोमँटिक गाणे रिलीज, पाहा VIDEO
Saam TV April 21, 2025 08:45 PM

'देवमाणूस' (Devmanus Movie) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन रोमँटिक गाणे 'सोबती' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. 'सोबती' हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून याआधी 'पांडुरंग' या भावस्पर्शी गाण्याने आणि 'आलेच मी' झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.

'सोबती' (Sobati ) हे गाणे (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा भावनिक प्रवास आणि त्यांच्यातील नात्याची गोडी सुंदरपणे टिपणारे आहे. या गाण्याला शेखर रावजियानी आणि आंबेकर यांनी गायले आहे. या गाण्याला रोहन-रोहन या जोडीचे संगीत दिले आहे. तर गीतकार प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांना रोहन प्रधान यांनी काही अतिरिक्त ओळी दिल्या आहेत.

आपला अनुभव सांगताना रावजियानी म्हणतात की, "जेव्हा रोहन-रोहन यांनी मला 'सोबती'साठी संपर्क केला. तेव्हा या गीतातील साधेपणा आणि भावनिकता मला लगेच भावली. हे गाणे साकारताना अतिशय छान अनुभव आला आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकही याच्या गाभ्याशी जोडले जातील."

'सोबती' गाण्याबद्दल आर्या आंबेकर म्हणते की, "शेखर सरांसोबत गायला मिळणं आणि रोहन-रोहन यांच्यासोबत काम करणं हे स्वप्नवत होतं. 'सोबती' हे अतिशय प्रेमळ आणि मनापासून गायलेलं गीत आहे. आम्ही यात जेवढं प्रेम ओतलं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे. हीच इच्छा आहे." 'देवमाणूस' हा चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.