Rohit Sharma: 'लहानपणी वानखेडेमध्ये येण्याची परवानगी नव्हती, पण आता नावाने स्टँड...' CSK विरूद्धच्या विजयानंतर रोहित भावूक
esakal April 21, 2025 09:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला ९ विकेट्सने पराभूत करत चौथ्या विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला होता. मुंबई इंडियन्सच्या या विजयात सलामीवीर रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सलामीला फलंदाजीला उतरला होता. त्याने आधी रायन रिकल्टन सोबत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली.

रिकल्टन २४ धावांवर बाद झाल्यानंतर त्याला सूर्यकुमार यादवने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी नंतर नाबाद ११४ धावांची भागीदारी करत १७७ धावांचे लक्ष्य गाठून देत मुंबईचा विजय १६ व्या षटकातच निश्चित केला.

रोहित शर्माने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ धावांची नाबाद खेळी केली. सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६८ धावांची खेळी केली, ज्यात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्माचे हे हंगामातील पहिलेच अर्धशतक आहे.

सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने विविध विषयांवर मत व्यक्त केले. चेन्नईच्या चाहत्यांकडूनही स्टेडियममध्ये त्याला पाठिंबा मिळत होता, याबद्दल तो म्हणाला, चाहत्यांना क्रिकेट आवडते. हेच वानखेडेबद्दल विशेष गोष्ट आहे. त्यांना चांगले क्रिकेट पाहायला आवडते.

तो त्याच्या फॉर्मबद्दल म्हणाला, 'मी इथे दीर्घकाळापासून खेळतोय, स्वत:वर शंका घेणे आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करणे सोपे असते. माझ्यासाठी साध्या सरळ गोष्टी करणे महत्त्वाचे होते. गोष्टी माझ्या डोक्यात स्पष्ट होत्या.'

'आम्हाला कसं खेळायचे आहे आणि आणि आमच्या डावाबद्दल योजना आखणे महत्त्वाचे होते. मी माझ्या योग्य ठिकाणी राहून शॉट्स खेळणे आणि जो चेंडू माझ्या टप्प्यात येईल, त्याला मी जे आजपर्यंत करत आलोय ते करणे महत्त्वाचे होते.'

क्षेत्ररक्षणावेळी शेवटच्या काही षटकांमध्ये इम्पॅक्ट सब्स्टिट्युट म्हणून खेळायला येण्याबद्दलच्या प्रश्नावर रोहित म्हणाला, 'आम्ही याआधी अशी चर्चा केली होती, पण २-३ षटकांनी फार मोठा फरक पडणार नाही. १७ षटके मैदानात नसल्यानंतर क्षेत्ररक्षण करणे कठीण असते. हाच विचार होता, पण जर माझ्या संघाला मी येऊन थेट फलंदाजी करावी, असे वाटत असेल, तर मला काही समस्या नाही.'

याशिवाय काही दिवसांपूर्वीच मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहित शर्माचे स्टँड स्टेडियमवर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

जिथे हे स्टँड होणार आहे, तिथेच रोहितने षटकारही मारला, त्यावर तो म्हणाला, 'ते स्टँड खूप दूर आहे, मी माझ्या खेळाचा आनंद घेतला. माझ्यासाठी मी शेवटपर्यंत उभा राहुन सामना संपवू शकलो, हे जास्त समाधानकारक आहे. आम्ही योग्यवेळी फॉर्म पकडला आहे, आम्ही सलग तीन विजय मिळवले आहेत.'

तथापि, स्टँडला त्याचे नाव देण्यात येणार आहे ही गोष्ट खूप भावनिक असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, 'हा मोठा सन्मान आहे, मी जसं म्हणालेलो की लहान असताना काहीवेळा आम्हाला स्टेडियममध्ये आत येण्याची परवानगी नसायची. पण मी माझ्या कारकिर्दीतील बरेच क्रिकेट इथे खेळलोय आणि आता माझ्या नावाचे स्टँड होणे हा खरंच खूप मोठा गौरव आहे. हे माझ्यासाठी भावनिक आहे. जेव्हा ते नाव तिथे दिसेल, तेव्हा मी कशी प्रतिक्रिया देईल माहित नाही.'

मुंबई क्रिकेट असोसिएशनने घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँड दिसणार आहे. यापूर्वीच वानखेडे स्टेडियमवर पॉली उम्रीगर, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचे स्टँड्स आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.