महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, म्हटले, ‘निवडणूक प्रक्रियेत गंभीर…’
GH News April 21, 2025 10:09 AM

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. भारतातील निवडणूक प्रक्रिया गंभीर समस्या असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी केला. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. ते बोस्टनमधील विद्यापीठात एका चर्चासत्रात बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदारांपेक्षा तरुण मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. परंतु त्यानंतर संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते, तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. हा प्रकार अचंबित करणार आहे. अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. मग तुम्ही गणना केली तर याचा अर्थ असा होईल की मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. म्हणजेच महाराष्ट्रातील निवडणुकीत रात्रभर मतदान सुरु होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्हिडिओ चित्रिकरणचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विचारले की, व्हिडिओग्राफी होत आहे का? त्यांनी केवळ व्हिडिओग्राफीला नकार दिला नाही, तर कायदाही बदलला, म्हणून आता तुम्ही व्हिडिओग्राफीची मागणी करू शकत नसल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आमच्यासाठी अगदी स्पष्ट झाले. व्यवस्थेत खूप गडबड आहे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक २३२ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.