वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे दिल्ली आणि हावडा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. राजधानी एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसनंतर या मार्गावरील ही तिसरी प्रिमियम सेवा असेल. ही ट्रेन 15 तासांपेक्षा कमी वेळात 160 किमी प्रतितास या वेगाने 1,449 किमी अंतर कापणार आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रने राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसपेक्षा वेगवान असेल. ही ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी 5 वाजता निघेल आणि सकाळी 8 वाजता हावडा येथे पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी हावडा येथून संध्याकाळी 5 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता दिल्लीला पोहोचेल.
दिल्ली आणि हावडा दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन कानपूर सेंट्रल, प्रयागराज जंक्शन, डीडी उपाध्याय जंक्शन, गया जंक्शन, धनबाद जंक्शन आणि आसनसोल जंक्शन येथे थांबेल. या ट्रेनच्या एसी थ्री-टायरचे भाडे सुमारे 3,000 रुपये, एसी टू-टायरचे 4,000 रुपये आणि फर्स्ट क्लास एसीचे 5,100 रुपये असण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबर 2024 मध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी तंत्रज्ञानाने बनवलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक दाखवली होती.