होय, त्यांच्यात नवं…शरद पवार-अजितदादांच्या दिलजमाईवर बड्या मंत्र्याचं सूचक विधान; म्हणाले पवार कुटुंब…
GH News April 21, 2025 06:13 PM

 Sanjay Shirsat : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळं वारं वाहू लागतंय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा चालू झाली आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. असे असतानाच आता शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाकित व्यक्त केलंय. पवार कुटुंबीय राजकारणाला दुय्यम स्थान देतात. कुटुंबाला ते प्राथमिकता देतात. त्यामुळे भविष्यात अजितदादा आणि शरद पवार यांचे पक्ष येऊ शकतात. ते एकत्र आले तर काही नवल नाही, असं शिरसाट म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र दिसले तर…

पवार आणि ठाकरे कुटुंबात काही फरक आहे, तुम्ही असे का म्हणाले? असे संजय शिरसाट यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना “पवार कुटुंबीय हे दिवाळी, दसरा अशा सणांना एकत्र येतं. या कुटुंबाने राजकारणाला दुय्यम स्थान देत कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणूनच उद्या शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र दिसले तर त्यात काहीच नवल वाटण्यासारखं नाही,” असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे- संजय शिरसाट

तसेच, “आम्ही राजकारण बाजूला ठेवतो. कुटुंबाला प्राथमिकता देतो, हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. म्हणूनच एकत्र येऊन त्यांच्यात नवं समीकरण घडू शकतं,” अशी शक्यता संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

एकत्र येण्यासाठी रोहित पवारांकडून साद

राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे त्याबाबात अंदाज लावण्यात अर्थ नाही. पवार कुटुंबीयाचं पहिल्यापासूनच सत्तेत राहण्याचं धोरण आहे. ते सत्तेमध्ये राहतात. उद्या ते एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, असंही शिरसाट म्हणाले. दरम्यान, खासदार शरद पवार आणि अजित पवार हे अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले आहेत. विशेष म्हणजे पवार घराण्यातील रोहित पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्याची थेट साद घातली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.