वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
वरिष्ठ भाकप नेते आणि ओडिशातील भाकपचे माजी सचिव दिवाकर नायक यांचे रविवारी निधन झाले आहे. नायक हे 72 वर्षांचे होते. नायक हे मागील काही काळापासून आजारी होते अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
दिवाकर नायक यांनी भुवनेश्वरच्या खारवेल भागात भाकपच्या राज्य मुख्यालयात अखेरचा श्वास घेतला आहे. बीज समन्वय समितीचे अध्यक्ष देवीप्रसाद मिश्रा, बीजद आमदार आर.पी. स्वॅन, बीजद आमदार गणेश्वर बेहरा, माकप नेत जर्नादन पति समवेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाकपचे मुख्यालय भगवती भवनमध्ये जात नायक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पांजली अर्पण केली आहे.
डाव्या विचारसरणीने प्रभावित नायक यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द भाकपची विद्यार्थी संघटना एआयएसएफचे सदस्य म्हणून सुरू केली होती. त्यानंतर ते भाकपमध्ये सामील झाले आणि याचे प्रदेश सचिव झाले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य देखील ते होते. भद्रक जिल्ह्याच्या सेंडचिटिरा गावात जन्मलेले नायक हे पक्ष प्रकाशन ‘नुआ दुनिया’चे माजी संपादक देखील होते.