जंगलाच्या विनाशासाठी आणि मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्रातली सत्ता हवी होती – जवाहर सरकार
Marathi April 21, 2025 09:27 PM

राज्य वन्यजीव मंडळाने 1800 हेक्टर वनजमिनीवरील 4 मेगा-प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी 4 लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यामुळे होणारा जैवविविधतेवरील परिणाम आणि पर्यावरणाच्या गंभीर संकटांचा इशारा दिला आहे. याबाबत माजी खासदार जवाहर सरकार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला महाराष्ट्रातील सत्ता का हवी होती, सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा आटापीटा का सुरू होता, ते आता स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात झांडांच्या कत्तलीमुळे जंगलांचा विनाश होणार आहे. यातून भाजपच्या मित्रांचा विकास होणार आहे, असा हल्लाबोल सरकार यांनी केला आहे.

याबाबत सरकार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, याचसाठी भाजपला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता हवी होती. सत्तेसाठी त्यांनी आमदार विकत घेतले, आमदार फोडले आणि निवडणुकीत गडबड घोटाळे करत सत्ता बळकावली आहे. आता भाजपचे मित्र चार लाख झाडे नष्ट करतील. त्यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. तसेच सुमारे 2000 हेक्टर वनजमीन उद्ध्वस्त होणार आहेत, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाने चारही मेगा-प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. 4 लाखांहू अधिक झाडांची कत्तल होणार असून 2000 वनजमीन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे यावर टीका होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.