Chandrakant Khaire : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आमच्यातील भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे, असे म्हणत भविष्यात मनसेची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाशी युती होऊ शकते, असे सूचक विधान केले. त्यानंतर राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता राज्यात मनसे (MNS) आणि ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) युती होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे या युतीच्या चर्चेनंतर अनेक बड्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर माझ्या डोळ्यात पाणी आले, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“राज ठाकरेंच्या सकारात्मकेला उद्धव ठाकरे यांनी टाळी दिली. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून हे पाहिजे होते. ते आज झालं, अशी भावना माझ्या मनात आल्या, अशी भावनिक प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली, अशा भावना खैरे यांनी व्यक्त केल्या.
तसेच, मी मातोश्रीप्रेमी आहे. मी ठाकरेप्रेमी आहे. माझे अनेक वर्षांपासून ठाकरे घराण्याशी संबंध आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर चमत्कार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड आहे, बाकी कोणी नाही, असेही चंद्रकांत खैरे यांनी मोठ्या विश्वासाने सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातही चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली. “सर्व महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मोठा बदल होणार आहे. जगावाटपाबाबत हे दोघे बंधू जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे,” असे मत खैरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना या युतीच्या चर्चेवर काहीही बोलू नये, असा आदेश दिला आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. ते महाराष्ट्रात आले की युतीच्या चर्चेवर ते भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या हातमिळवणीविषयी भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.