(Thackeray brothers) मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला आणि त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत भाजपाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नाखुशी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दोघांवर निशाणा साधला आहे. (Thackeray brothers: Sanjay Raut targets Fadnavis and मराठी)
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी देण्याबद्दल राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी केला असता, राज ठाकरे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.’ याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा – Thackeray and Thackeray : भाजपा, एसंशिंकडून राज यांच्या खांद्याचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हाती घेतली पाहिजे ही लोकभावना होती आणि अजूनही आहे. तीच भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.
महाराष्ट्राने कायम ठाकरे कुटुंबावर प्रेम केले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्या कुटुंबावर राज्यातील जनतेचे मनापासून प्रेम होते आणि आजही आहे. म्हणूनच आम्ही या सर्व घडामोडींकडे सकारात्मक दृष्टीने पाहात आहोत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने काही लोकांना वेदना होणारच. कारण ते दोघे एकत्र आले तर आम्हाला कायमचे शेतावर जायला लागेल किंवा आम्हाल संघ दक्ष शाखेत जावे लागेल, असे त्यांना वाटते. त्याचीच काहींना भीती वाटत असेल आणि त्यातून काही मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा – मराठी : उद्धव – राज ठाकरे एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले…