भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १८ हंगाम जोशात सुरू आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा पडला असून आता दुसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीनेही शर्यत रंगतदार होण्यास सुरूवात झाली आहे.
अशातच बीसीसीआयने आयपीएलमध्ये एक नवीन सदस्य आणला आहे. हा सदस्य म्हणजे रोबोटिक डॉग अर्थात यांत्रिक कुत्रा. रिमोटवर या कुत्र्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याच्याबद्दल फक्त चाहत्यांमध्येच नाही, तर खेळाडूंमध्येही कुतूहल दिसून येत आहे. मैदानावर तो दिसताच, त्याच्यासोबत खेळाडू मस्तीही करत आहेत.
आता त्याला नावही देण्यात आले असून त्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने गमतीशीर प्रतिक्रियाही दिली आहे. तसेच त्याचं नाव ऐकून अनेकांना तारक मेहता का उल्टा चश्मा या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचीही आठवण झाली आहे.
काय आहे नाव आणि ते कसं मिळालं?या रोबोटिक डॉगचं नाव चंपक असं ठेवण्यात आलं आहे. आयपीएलकडून गेल्या काही दिवसांपासून याचं नाव ठेवण्यासाठी वोटिंग घेण्यात आले होते.
चाहत्यांना चार नावांमधून एक नावाला मत देण्यास सांगण्यात आलं होतं. यात चंपकशिवाय बडी, जॅफा आणि चुलबूल या नावांचेही पर्याय होते. पण रविवारी (२० एप्रिल) आयपीएलकडून त्याचं नाव चंपक ठेवल्याचं घोषित करण्यात आलं.
या चंपकसोबत मस्ती करताना दिसला होता. रविवारी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. सामन्यानंतर हार्दिक मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांच्यासोबत उभा असताना चंपकच्या रिमोटशी खेळत होता.
या रिमोटवरून तो चंपक काय काय कृती करतो, हे पाहात होता. यावेळी अचानक चंपकने उडी मारल्यानंतर आकाश अंबानी घाबरले, ते पाहून हार्दिकला हसू आवरता आले नाही, हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
याशिवाय मुंबई इंडियन्सनेही हार्दिकचा चंपकसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात या रोबोटिक डॉगचं भारतीय नाव ठेवल्याबद्दल हार्दिक कौतुक करतानाही दिसतो. या व्हिडिओमध्ये तो चंपकला 'बाय भिडू' असं म्हणत पुढे निघाला होता.
त्यावेळी तो तिथे असलेल्या कोणालातरी त्याचं नाव चंपक ठेवलंय का, असंही विचारतो. त्यानंतर हार्दिक म्हणतो, 'हा हे कसं आपलं वाटतं, हिंदूस्तान जिंदाबाद. असंच नाव चांगलं वाटतं.' हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या रोबोटिक डॉगचं नाव चंपक ऐकून अनेकांना तारक मेहता का उल्टा चश्मा आठवला आहे, यामागील कारण म्हणजे त्यातील प्रमुख भूमिका असलेला जोठालाल याच्या वडिलांचे नाव चंपकलाल गडा असे असते. ही भूमिका बरीच वर्षे अमित भट यांनी केली होती, जी खूप प्रसिद्धही झाली. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना आयपीएलमध्ये चंपक नाव ऐकून आनंदही झाला आहे. याबद्दल त्यांनी कमेंट्सही केल्या आहेत.
आयपीएल २०२५ स्पर्धेत गुणतालिकेत सध्या ३९ सामन्यांनंतर गुजरात टायटन्स सर्वाधिक १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर प्रत्येकी १० गुणांसह आहेत.
सहाव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स ८ गुणांसह आहे, तर सातव्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स ६ गुणांसह आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स हे प्रत्येकी ४ गुणांसह अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. काही संघांचे गुण तरी सारखे असले, तरी नेट रन रेटच्या फरकामुळे क्रमवारी ठरवली जात आहे.