पित्तप्रकृती की पचनबिघाड?
esakal April 22, 2025 10:45 AM

डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट

‘पित्तप्रकृती’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो – अॅसिडिटी, उकाडा, फोड-पुरळ अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तीला सहजपणे ‘पित्त वाढलंय’ असं म्हटलं जातं. पारंपरिक आयुर्वेदात याला ‘पित्तदोष’ मानलं जातं; पण फंक्शनल मेडिसिनच्या भाषेत पाहिलं, तर ही लक्षणं अनेकदा Hypochlorhydria – म्हणजेच जठरातील आम्ल (Stomach acid – HCL) कमी होणं – यामुळे होतात.

हायड्रोक्लोरिक अॅसिड केवळ अन्न पचवण्यासाठी नाही, तर पोषणद्रव्यांचं शोषण, रोगजंतूंना रोखणं, आणि संपूर्ण पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचं असतं. हेच अॅसिड कमी होतं, तेव्हा अॅसिडिटी, ब्लोटिंग, जळजळ, थकवा, त्वचेवर पुरळ अशी लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे पित्तवाढीचा अर्थ अॅसिड जास्त आहे असा नसून, उलट ते कमी आहे असाही असू शकतो.

अशा अवस्थेत आपण अतिउष्मांक पदार्थ – उदाहरणार्थ, मिरच्या, लसूण, कॉफी, मद्य, प्रोसेस्ड अन्न, साखर, किंवा तळलेले पदार्थ – खाल्ले, तर ते पचनावर अजूनच ताण आणतात. शरीर आधीच अॅसिड तयार करत नसेल, तर अशा अन्नामुळे त्रास वाढतो.

अंडी, मासे, चिकन हे नैसर्गिक प्रथिनांचे स्रोत आहेत. आपण प्रथिनअभावी देश आहोत, त्यामुळे अॅसिडिटीच्या भीतीनं प्रथिनं वर्ज करणं योग्य नाही. अॅसिडिटी खरंतर जास्त कर्बोदकांमुळे होते, प्रथिनांमुळे नाही.

फंक्शनल मेडिसिनमध्ये या समस्येवर उपाय म्हणजे – प्रत्येकाची प्रकृती, पचनशक्ती आणि जैविक चयापचय (metabolism) समजून, त्या अनुषंगाने योग्य आहार देणं. नैसर्गिक पद्धतीने आम्लवाढीसाठी लिंबू, अॅपल सायडर व्हिनेगर यांचा उपयोग होतो, तर काकडी, ताक, हळद, कोथिंबीर यांसारखे थंडावणारे पदार्थ पचनाला आधार देतात.

अँटासिड्सचे नुकसान

अनेकदा अॅसिडिटीसाठी अँटासिड घेतलं जातं; पण ते फक्त तात्पुरतं आराम देतं. Hypochlorhydria हे मूळ कारण दूर करत नाही. उलट, सतत अँटासिड घेणं हे अॅसिड अजूनच कमी करतं. म्हणूनच, ‘पित्त वाढलंय’ म्हणण्याऐवजी ‘माझं पचन नीट आहे का?’ असा विचार करून योग्य दिशेनं कृती करणं – हाच खरा आधुनिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.