सद्गुरू
प्रश्न : स्वार्थीपणा टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
सद्गुरू : तुम्ही स्वार्थी असणे टाळू शकत नाही. ‘मला स्वार्थी व्हायचे नाही, मला स्वार्थी व्हायचे नाही...’ हे खूप स्वार्थीपणाचे आहे. स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहा आणि मला सांगा, तुम्ही खरंच स्वार्थी न असण्यासाठी सक्षम आहात का? तुम्ही कोणत्याही प्रकारे पाहिले, तरी ज्या दृष्टिकोनातून तुम्ही जीवनाला जाणता, ते स्वतःच्या माध्यमातूनच. म्हणून निःस्वार्थीपणा अशी कोणतीही गोष्ट नाही. स्वतःला नैतिकतेने फसवू नका. स्वार्थी न असण्याचा प्रयत्न करा आणि पाहा, तुम्ही फक्त स्वतःला फसवाल. निःस्वार्थीपणा ही एक खोटी गोष्ट आहे, जी नैतिकतेने जगात निर्माण केली आहे, ज्यामुळे अनेक लोक फसवले जात आहेत.
लोक विचार करतात, ‘मी निःस्वार्थीपणे काहीतरी करत आहे.’; पण ते करतात यामागचे कारण म्हणजे, ते केल्यामुळे त्यांना आनंद मिळतो. म्हणून निःस्वार्थी होण्याचा प्रश्नच नाही. स्वार्थी व्हा; पण संपूर्णपणे स्वार्थी व्हा. सध्या समस्या अशी आहे की, तुम्ही तुमच्या स्वार्थीपणाबाबतही कंजूष आहात.
सध्या, तुमचा स्वार्थीपणा ‘मला आनंदी व्हायचे आहे’ इथपर्यंत मर्यादित आहे. पूर्णपणे स्वार्थी व्हा : ‘मला संपूर्ण विश्व आनंदी हवे आहे. मला अस्तित्वातील प्रत्येक अणू आनंदी हवा आहे.’ संपूर्णपणे स्वार्थी व्हा. मग काहीही समस्या नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थीपणातही कंजूष आहात, हीच समस्या आहे.
आपण स्वार्थी होऊ या, त्यात काय अडचण आहे? पण आपण अमर्यादित पद्धतीने स्वार्थी होऊ या. निदान आपल्या स्वार्थीपणात, आपण संपूर्णपणे राहू या. आयुष्याच्या अनेक पैलूंमध्ये आपण संपूर्ण व्हायला तयार नाही आहोत. निदान आपण संपूर्णपणे स्वार्थी होऊ या.
शून्य किंवा अनंततुम्हाला सर्वोच्च पातळी गाठायची असेल, तर तसे करण्याचे केवळ दोन मार्ग आहेत: एकतर तुम्ही शून्य झाले पाहिजे, किंवा तुम्ही अनंत झाले पाहिजे. ते वेगवेगळे नाहीत. निःस्वार्थी होण्याचा प्रयत्न करताना, तुम्ही स्वतःचे प्रमाण कमी करता - तुम्ही स्वतःला दहावरून पाचवर आणता, पण तुम्ही स्वतःला विलीन करू शकत नाही.
एकतर तुम्ही पूर्ण शून्य व्हावे, किंवा तुम्ही अनंत व्हावे. भक्तीचा मार्ग हा विलीन होण्याचा आहे. तुम्ही शरण जाता आणि शून्य बनता - मग कोणतीच समस्या नाही. किंवा सर्व काही तुमचाच भाग म्हणून सामावून घेता आणि सर्व काही बनता - यात पण कोणतीही समस्या नाही; पण एकदा का तुम्ही स्वतःबद्दल बोलू लागला, काहीतरी अस्तित्वात येते, त्यामुळे विलीन होणे अशक्य ठरते. म्हणून तुम्ही अमर्यादित झालेले चांगले. तुमच्यासाठी या मार्गावर चालणे सोपे आहे.