Ajinkya Rahane: 'T20 मध्ये धाडसी असावच लागतं...' रहाणेने कोणावर फोडलं KKR च्या गुजरातविरुद्धच्या पराभवाचं खापर?
esakal April 22, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात टायटन्सविरुद्ध ३९ धावांनी पराभवाचा धक्का बसला. हा गतविजेत्या कोलकाताचा ८ सामन्यांमधील पाचवा पराभव होता.

त्यामुळे आता कोलकातासमोरील आव्हान आणखी कठीण झाले आहे. गेल्या काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही कोलकाताचे फलंदाज धावा करताना संघर्ष करताना दिसले. या सामन्यानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रतिक्रिया दिली असून पराभवामागील कारणही स्पष्ट केले आहे.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९८ धावा करत कोलकातासमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ९० धावांची खेळी केली, तर साई सुदर्शनने ५२ धावा केल्या. जॉस बटलरने ४१ नाबाद धावांची खेळी केली. पण यानंतरी कोलकाताने गुजरातला २०० धावांच्या आत रोखले होते.

मात्र, नंतर १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ८ बाद १५९ धावाच करता आल्या. कोलकाताकडून अजिंक्य राहणेने ५० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय फक्त आंद्रे रसेल (२१) आणि अंगक्रिश रघुवंशी (२७*) यांनाच २० धावांचा टप्पा ओलांडता आला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि राशीद खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

या सामन्यानंतर गोलंदाजांकडून फारशी चूक झाली नसल्याचे म्हणत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला आहे की फलंदाजीत सुरुवात चांगली मिळायला हवी.

रहाणे म्हणाला, 'मला वाटलं की १९९ धावांचा पाठलाग होऊ शकत होता. आम्ही गोलंदाजी करताना सामन्यात चांगले पुनरागमन केले. पण जेव्हा तुम्ही १९९ धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला, चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असते. याच ठिकाणी आम्ही या संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करत आहोत.'

'या खेळपट्टीवर १९९ धावा पाठलाग करण्यासारख्या होत्या, असं मला वाटतं. आम्ही गोलंदाजी चांगली केली, पण आमची फलंदाजी चांगली झाली नाही. आम्हाला शक्य तितक्या लवकर शिकावे लागेल आणि पुढे जावे लागेल.'

खेळपट्टी धीम्या गतीची होती, पण गुजरातला २०० च्या आत रोखणे चांगले असेल असा विचार आम्ही केलेला, असंही तो म्हणाला.

तो म्हणाला, 'आम्हाला येथील परिस्थिती चांगली माहित आहे, पण आम्हाला मधल्य षटकातही चांगली फलंदाजी करावी लागेल, तिथे आम्ही संघर्ष करत आहोत. जेव्हा तुम्ही मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असता, तेव्हा सलामीवीरांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असते. फलंदाजीत आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. गोलंदाजांबद्दल कोणतीच तक्रार नाही.'

या सामन्यात कोलकाताचे क्षेत्ररक्षणही ढेपाळले होत. याबाबत रहाणे म्हणाला, 'क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे, जी संघ म्हणून नियंत्रित करू शकतो असं मला वाटतं. जर तुम्ही मैदानात १०-१५ धावा रोखू शकला, तर संघासाठी ते फायद्याचेच ठरते. तुमचा हेतू आणि दृष्टीकोन यात महत्त्वाचा असतो. तुम्हाला संपूर्ण २० षटके सक्रिय रहावे लागते, तिथेही आम्ही कमी पडत आहोत. पण खेळाडू मेहनत घेत आहेत.'

'टी२० क्रिकेटमध्ये तुम्हाला धाडसी असावेच लागते. तुम्ही भूतकाळाचा फार विचार करू शकत नाही. तुम्हाला चुकांमधून शिकावे लागते. तुम्ही जेव्हा चांगला खेळ करत असता, तेव्हा त्यात आणखी सुधारणा करायची असते. जर तुम्ही चांगले खेळत नसाल, तरी १ टक्का जरी संघ म्हणून सुधारणा करू शकलो, तरी ते खूप महत्त्वाचे असते.'

रहाणे पुढे म्हणाला, 'फलंदाजीतही तुम्हाला धाडसी व्हावे लागेल, संधीचा फायदा घ्यावा लागेल आणि सकारात्मक मानसिकता ठेवावी लागेल. जर तुम्ही आऊट होण्याचा विचार केला, तर तुम्ही आऊट होणार आहात. जर तुम्ही धावा करण्याचा विचार कराल, तर ते होईल. मला खात्री आहे, फलंदाज तसा विचार करत असतील.'

'वेळेसोबत गोष्टी बदलतात. आमच्याकडे मधल्या फळीत प्रतिभाशाली फलंदाज आहेत. मी त्यांना पूर्णपणे पाठींबा देणारच आहे. अंगक्रिश खरंच चांगली फलंदाजी करतोय. आज आम्ही इतर खेळाडूंनाबी रन रेन वाढवण्यास सांगितले आहे.'

कोलकाताचा पुढचा सामना २६ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.