Maharashtra Live Updates : ठाकरे बंधूंच्या मनोमीलनावर, पवारसाहेब अन् अजितदादांच्या वाढलेल्या भेटीवर आमदार सावे यांची प्रतिक्रिया
Sarkarnama April 22, 2025 11:45 AM
Atul Save : ठाकरे बंधू मनोमीलनावर, पवारसाहेब अन् अजितदादांच्या वाढलेल्या भेटीवर आमदार सावे यांची प्रतिक्रिया

भाजप आमदार अतुल सावे यांनी ठाकरे बंधू यांच्या मनोमीलनावर, आणि पवार कुटुंबांच्या वाढलेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये ते एकत्रित असेल तर आनंद आहे. पवारसाहेब आणि अजितदादा चौथ्यांदा एकत्र आले आहेत, त्यावर हा प्रश्न मला विचारून काय फायदा आहे, त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही दोन्ही प्रश्न चुकीचे विचारले, असे आमदार सावे यांनी म्हटले.

BJP Nitesh Rane : गोमूत्र आरोग्यासाठी फार चांगलं असतं, मी पितो; मंत्री नीतेश राणेंचं वक्तव्य

योगगुरू बाबा रामदेव यांनी एका शरबतचा 'जिहाद'शी संबंध जोडून एक नवा वाद निर्माण केला आहे. यातून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात, असा दावाही बाबा रामदेव यांनी होता. यानंतर आता राज्याचे मत्स व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रश्नावर थेट उत्तर दिलं टाळलं. 'मात्र, मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं', असे उत्तर दिलं आहे.

Mumbai Crime Update : बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

Radhakrishna Vikhepatil : कालवा दुरुस्तींच्या कामांना लवकरच निधी देणार; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूरच्या पढेगावातील 12 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ तसेच ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्याहस्ते झाले. सरपंच किशोर बनकर, महेश खरात, पुष्पा भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते

Ramdas Athawale News : दोघे भाऊ एकत्र आले तरी महायुतीला कुठलाही धोका नाही

सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. यावर अनेक नेत्यांनी वक्तव्य केले आहे. दोघे एकत्र आल्यास काय होणार याचे राजकीय आडाखेसुद्धा मांडले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याचे परिणाम जाणवेल असेही भाकित वर्तविले जात आहे. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, दोघे भाऊ एकत्र आले तरी महायुतीला कुठलाही धोका होणार नाही, असे म्हटलं आहे. तर सर्व रिपब्लिकन पक्षांनीसुद्धा एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही साद घातली आहे.

Sanjay Shirsat : 'होय, नवं समीकरण..', काका-पुतण्याच्या दिलजमाईवर शिंदेंच्या शिलेदाराचं सूचक वक्तव्य

राज्याच्या राजकारणात सध्या वेगळं वारं वाहू लागले असून मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं असेही आवाहन केलं जातयं. अशावेळी यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य करताना, ते एकत्र आले तर काही नवल वाटणार नाही, असे म्हटलं आहे.

Anil Deshmukh News : 'तर सर्वाधिक आनंद स्वर्गीय बाळासाहेबांना होईल' : अनिल देशमुख

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत स्वत: राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली असून ही चांगली गोष्ट आहे. ते दोघं एकत्र आले तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. यामुळे सर्वांनाच आनंद होईल. पण याचा सर्वाधिक आनंद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना होईल. दोघं भाऊ एकत्र आले, तर महाराष्ट्रात एक वेगळी ताकद त्यानिमित्ताने निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Rohit patil : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल

राज्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला उधाण आलं असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र यावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील तशी इच्छा व्यक्त केली आहे. यादरम्यान आमदार रोहित पाटील यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Beed Santosh Deshmukh : बीडमध्ये विद्यालयाला नाव देण्याबरोबर संतोष देशमुख यांचा पुतळा उभारला जाणार

बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे याकरिता माध्यमिक विद्यालयाला संतोष देशमुख यांचे नाव देणार असल्याची घोषणा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळा बांगर यांनी केली. याच महाविद्यालयाच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा देखील उभारणार असून या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचे बाळा बांगर यांनी सांगितले.

Mumbai 26/11 Attacks News : भाजप नेत्याचे गंभीर आरोप? 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा वाटा?

मुंबईवर झालेल्या 26 /11 च्या आतंकवादी हल्ल्याबाबत भाजपच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन सरकारमधील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 26/11 च्या हल्ल्यांमध्ये वाटा होता असा आरोप जनता पार्टीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे.

Chandrahar Patil : ठाकरेंचा पैलवान शिवबंधन तोडणार? नव्या राजकीय मैदानाची चाचपणी सुरू? दिले थेट संकेतही

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी, आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे सांगितलं आहे. तसेच त्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतल्याचे सांगितले आहेत.

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांचं निधन

ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वॅटिकन सिटीमध्ये त्यांचे निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Devendra Fadnavis : वारंवार निवडणूक हरल्यामुळे राहुल गांधीच्या मनावर परिणाम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत संवाद साधताना भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले होते. त्यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. देशाच्या प्रती, देशाच्या संविधानाने ज्या संस्था तयार केल्या आहेत त्यांच्याबाबत खोटं बोलत आहेत. त्या संस्थांबाबत खोटं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट असून वारंवार निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Nashik Satpir Dargah : नाशिक दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा प्रकरणी आज दि.२१ सर्वाच्च न्यायालयात सुनावणी आहे. नाशिक महापालिकेने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा दर्गा पाडल्याने पालिकेकडे न्यायालयाने खुलासा मागविल्याने पालिका काय बाजू मांडणार हे पाहावे लागणार आहे.

Pooja Khedkar : पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण

पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील असे न्यायालयाने नमूद केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.  मात्र 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला दिले आहेत.

Ashwini Bidre News: हत्येचा गुन्हा सिद्ध

पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Nashik News: नाशिक महापालिकेच्या गेटसमोर मनसैनिकांकडून घंटा नाद आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकमधील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्यात येत आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाप्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह मनसैनिकांकडून नाशिक महापालिका गेटवर घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत घंटा वाजवत मनसेचे आंदोलन सुरू केले आहे.

Ashwini Bidre News: अश्विनी बिद्रे हत्याकांड, आज शिक्षा होणार...

पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दुपारी ही सुनावणी होणार आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयात हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह दोन जणांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे. अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे आणि मुलगी सिद्धीने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत.

Maharahstra LIVE: राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थबाहेर झळकले बॅनर

शाळांमध्ये हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राचे राजकारण पेटलं आहे. मनसेनं हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये राजकीय वॉर सुरु झाले आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थबाहेरही हे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी केली. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर दादर परिसरात झळकलेत आहेत.

ग्रामपंचायतमध्येच बालविवाह लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केली कारवाई

बारामतीमध्ये माळेगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामपंचयातीला या विषयी काहीच माहिती नव्हती. अल्पवयी मुलीच्या विवाहाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत हा प्रयत्न हाणून पाडला. मुलीचे वय अवघे तेरा वर्ष असल्याचे समोर आले.  ग्रामसेवक इम्तियाज इनामदार यांनी फिर्यादीनुसार मुलीचे वडील, आई, होणारे सासरे, ,सासू आणि नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला.

राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेच्या गर्भातून - संजय राऊत

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सामनाच्या अग्रलेखातून मत मांडण्यात आले आहे. अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. 

निवडणुकीत प्रक्रियेत गंभीर समस्या, महाराष्ट्रात मतदान वाढीममागे घोळ - राहुल गांधी

राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौैऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले,  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. पण संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. या संख्येमध्ये मोठा घोळ आहे. कारण येवढे मतदान झाले तर पहाटे तीन पर्यंत मतदान होणे अपेक्षित होते मात्र निवडणूक आयोग आम्हाला मतदानाचे व्हिडिओ देखील देत नाही.

शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र

पुण्यात एका बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज दोघेही एकत्र येणार आहेत. साखर संकुलातील तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी हे दोनही नेते एकत्र येतील.

Ashish shelar On Raj Thackeray : वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला - आशिष शेलार

वैयक्तिक मित्र होते. राज ठाकरेंशी हात मिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र, ती अट आहे की राजकीय कट आहे अशी शंका आहे. आता वैयक्तिक मित्र विषय संपला, असे देखील शेलार म्हणाले

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.