मोठी बातमी! दूषित अन् कमी दाबाच्या पाण्याची तपासणी करणार आता रोबोट! ड्रेनेजमध्ये १२० मीटरपर्यंत आत शिरू शकतो रोबोट
esakal April 22, 2025 04:45 AM

सोलापूर : शहरात दोन विभागीय कार्यालयांतर्गत एकूण १२ ठिकाणी पाण्याचा दाब आणि दूषित पाणीपुरवठ्याबाबत रोबोटच्या माध्यमातून चाचणी करण्यात आली. यातील एका ठिकाणी दूषित पाणी आढळले तर पाच ठिकाणी पाण्यातील क्षारामुळे झालेल्या गाठींमुळे प्रेशर कमी झाल्याचे दिसून आले.

सोलापुरातील दूषित पाणी, चेंबरमधील अडथळ्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी दोन रोबोट चार दिवसांच्या चाचणीसाठी महापालिकेत दाखल झाले. ज्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्या ठिकाणची प्राधान्याने चाचणी करण्यात आली. विभागीय कार्यालय एकमध्ये आणि विभागीय कार्यालय पाच अंतर्गत साधारण १२ ठिकाणी रोबोटच्या माध्यमातून जलवाहिनीची चाचणी झाली. यामध्ये एकाच ठिकाणी दूषित पाणीपुरवठा आढळून आला असून, उर्वरित ठिकाणी जलवाहिनीमध्ये क्षारांच्या गाठींमुळे पाणी कमी दाबाने येत असल्याचे निदर्शनास आले. रोबोटच्या कामाची पद्धत जाणून घेण्यात आली. त्यासंदर्भात महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेने शहरातील जलवाहिनीतील दूषित पाणी, गळती आणि ड्रेनेजमधील चोकअप (अडथळे) शोधण्यासाठी दोन एन्डोबोट रोबोट तंत्रज्ञानासाठी अंदाजपत्रकात तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील घटनेनंतर या कामांसाठी रोबोट उपयुक्त ठरल्यास महापालिका दोन रोबोट खरेदी करणार आहे. पाणी व ड्रेनेजमधील अडथळे शोधण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात.

काही मीटरपर्यंत खोदकाम करण्यात येते. हे केल्यावर देखील चोकअप झालेली जागा किंवा जलवाहिनीला गळती लागलेली जागा लगेच सापडत नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला विलंब होतो. पैसाही खर्च होतो आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था होते. या पाच दिवसांच्या चाचणीनंतर त्याची उपयुक्तता लक्षात घेत, रोबोट खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चाचणीप्रसंगी पाणीपुवरठा विभागाचे तपन डंके, प्रशिक बादोले, एस. सावंत यांच्यासह विभागीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

‘या’ ठिकाणांची झाली चाचणी

विजापूर रोडवरील निर्मिती गणेश सोसायटी, स्वामी गल्ली, राजस्वनगर, बागले वस्ती, बक्षी गल्ली, मुजावर वाडा या विभागीय कार्यालय पाच व विभागीय कार्यालय एक अंतर्गत साधारण १२ ठिकाणांची रोबोटद्वारे चाचणी करण्यात आली. रोबोटची क्षमता १२० मीटर इतकी आहे. यासर्वच ठिकाणी कुठे २८ मीटर, कुठे ५० तर कुठे ७० ते ९० मीटरच्या जलवाहिनीअंतर्गत चाचणी करण्यात आली. निर्मिती सोसायटीमध्ये दूषित पाणी होते, त्याची दुरुस्ती केली आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनीत क्षारयुक्त गाठी आढळून आले, त्या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.