इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२१ एप्रिल) गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्याच घरच्या मैदानात ३९ धावांनी पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यातही गेल्या सामन्याप्रमाणेच कोलकाताची फलंदाजांनी निराशा केल्याचे दिसले. गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध ११२ धावांचाही पाठलाग करता आला नव्हता. या सामन्यातही त्यांना फार काही करता आले नाही.
कोलकाताचा हा ८ सामन्यांतील पाचवा पराभव आहे. तथापि, गुजरातने मात्र आपली वाटचाल प्लेऑफच्या दिशेने सुरू ठेवली आहे. गुजरातचा ८ सामन्यांतील ६ वा विजय आहे. त्यामुळे त्यांचे १२ गुण झाले आहेत. या हंगामात १२ गुण मिळणारा गुजरात पहिला संघ आहे. गुणतालिकेतही ते गेल्या काही दिवसांपासून पहिले स्थान राखून आहेत.
साधारणत: आयपीएलमध्ये पहिल्या १० सामन्यातच १२ गुण मिळवल्यानंतर संघांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के मानले जाते. त्यामुळे आता पुढेही चांगला खेळ करत प्लेऑफमध्ये तिसऱ्यांदा स्थान मिळणार का हे पाहावे लागणार आहे.
सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरातने १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकात ८ बाद १५९ धावाच करता आल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंज दिली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
कोलकाताकडून रेहमनुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांनी सलामीला सुरुवात केली होती. पण गुरबाज १ धावेवरच मोहम्मद सिराजविरुद्ध खेळताना पायचीत झाला. तरी नरेनने रहाणेच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण नरेनला राशीद खानने राहुल तेवातियाच्या हातून झेलबाद केले. नरेनने १३ चेंडूत १७ धावा केल्या.
नंतर वेंकटेश अय्यरने अजिंक्य रहाणेची साथ दिली होती. पण तोही स्थारावल्यानंतर १९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला.
रहाणेने अर्धशतक पूर्ण केले. तो रिंकू सिंगसह डाव पुढेही नेत होता. पण अखेर त्याला १२ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक जॉस बटलरने यष्टीचीत केले. त्यानंतर मात्र कोलकाताची फलंदाजी ढेपाळली.
इतकंच नाही, तर मधल्या षटकात गुजरातच्या गोलंदाजांनी मोठ्या धावाही करण्यापासून कोलकाताला रोखले. कर्णधार शुभमनने रिंकू सिंगची ज्या ठिकाणी मारण्याची ताकद आहे, तिथे क्षेत्ररक्षक ठेवले होते. त्यामुळे कोलकातासमोरील धावगतीचे गणितही बिघडत गेले.
रिंकू सिंगसोबत फलंदाजी करताना आंद्रे रसेल आक्रमक खेळला, पण १५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह २१ धावांवर असताना त्याला राशीद खानने बाद केले. त्याच्या गोलंदाजीवर बटलरने त्याला यष्टीचीत केले.
रमणदीप सिंग (१) आणि मोईन अली (०) यांना १७ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. शेवटच्या षटकात रिंकू सिंगही १४ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. अंगक्रिश रघुवंशीने १३ चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली.
गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि राशीद खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. त्यांनी दोघांनीही प्रत्येकी ४ षटकात २५ धावा दिल्या. मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि साई किशोर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १९८ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने ५५ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ९० धावा केल्या. साई सुदर्शनने ३६ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. तसेच जॉस बटलरने २३ चेंडूत ४१ धावा केल्या.
कोलकाताकडून वैभव अरोरा, हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.