Gold Price : लाखमोलाचं सोनं, लग्नसराईच्या काळातच दर ९९ हजारांपर्यंत
esakal April 22, 2025 10:45 AM

नवी दिल्ली : घसरता डॉलर आणि अमेरिका चीन व्यापार युद्धातील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या भावाने आज एक लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. नवी दिल्लीत दहा ग्रॅम ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव (२४ कॅरेट) १,६५० रुपयांनी वाढून ९९,८०० रुपयांपर्यंत गेला.  जीएसटी दरासह ग्राहकांसाठी सोन्याचे दर लाखांच्या वर गेले आहेत. चांदीचे भावही आज प्रति किलोमागे पाचशे रुपयांनी वाढून ९८ हजार पाचशे रुपयांपर्यंत गेले. लवकरच सोन्याचांदीचे भाव एक लाख रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अक्षय तृतीयेला आठ दिवस बाकी असताना, सोन्यातील ही भाववाढ सामान्य ग्राहकांचा हिरमोड करत आहे.

सोन्याच्या भावात आज १,६५० रुपये वाढ झाली, असे ऑल इंडिया सराफ असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे हे भाव आहेत. मागील आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्याचे भाव २० रुपये घसरून ९८ हजार १५० रुपये झाले होते. डॉलरचे भाव घसरत असल्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत असल्याचे जाणकारांनी सांगितले. ९९.५ टक्के शुद्धतेचे सोनेही आज १,६०० रुपयांनी उसळून ९९ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहोचले. या कॅलेंडर वर्षाच्या चार महिन्यांत म्हणजे ३१ डिसेंबरपासून १० ग्रॅम सोन्याचे भाव २६.४१ टक्के म्हणजे २०,८५० रुपयांनी वाढले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या जून महिन्याचे फ्युचर्स १.७ टक्के म्हणजेच १,६२१ रुपयांनी वाढवून ९६ हजार ८७५ रुपयांपर्यंत पोहोचले. जळगावमध्ये सोन्याचा भाव सोमवारी (ता. २१) प्रति दहा ग्रॅम (जीएसटीसह) ९९ हजार ३९५ रुपयांवर गेला, तर चांदीचा भाव प्रति किलो ९८ हजार ४२५ (जीएसटीसह) रुपये होता. चांदीचा सोमवारी (ता. २१) भाव प्रतिकिलो जीएसटीसह ९८ हजार ४२५ असा आहे.

अमेरिकेने भारतावर आयातशुल्क लावल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव घसरले होते. आता काही दिवसांसाठी अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयातशुल्काला ‘ब्रेक’ दिला आहे. यामुळे पुन्हा सोन्या-चांदीच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे; तसेच डॉलरचे भाव घसरत असल्यामुळे आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत. त्यामुळेही सोन्याचे भाव वाढत आहेत. ‘ईटीएफ’ गुंतवणूकदारांमध्येही सोन्याबाबत उत्साह असून, आगामी सणासुदीच्या काळासाठी आणि लग्नसराईमुळेही खरेदी सुरू असल्याने सोन्याची झळाळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्रणव मीर, कमोडिटी तज्ज्ञ, जे. एम. फायनान्शिअल सर्व्हिसेस

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.