भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही अनेकजण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वात काम करतात. पण काही दिवसांपूर्वीच सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसह चार जणांना बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमधून काढून टाकले आहे.
नायर तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघात पुन्हा दाखलही झाला आहे. नायरसह बीसीसीआयने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई आणि मसाजर अरुण कानडे यांनाही त्यांच्या पदावरून काढले आहे.
यानंतर आता सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून यापुढे काम पाहणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केल कायम आहे, तर फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सितांशू कोटक सांभाळत आहेत.
अशात आता गंभीरला आणखी सहय्यक प्रशिक्षकाची आवश्यकता असेल, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. पण तरी हरभजन सिंगने म्हटले आहे की आशिष नेहराचा प्रशिक्षकपदासाठी विचार करायला हवा.
आशिष नेहरा २०२२ पासून आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनात गुजरातची कामगिरी चांगली झाली आहे. त्याच्या प्रशिक्षणाचे आत्तापर्यंत अनेकांनी कौतुक केले आहे. हरभजन सिंगने तर म्हटले आहे की त्याच्याशिवाय उत्तम पर्याय कोणताच असू शकत नाही.
युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की 'मला वाटते नेहराशिवाय भारतीय संघासाठी सध्याची परिस्थिती लक्षात घेता दुसरा चांगला प्रशिक्षक असूच शकत नाही. तो महान प्रशिक्षक आहे.
बीसीसीआयने त्याला विचारायला हवे की त्याला भारतीय संघासाठी काम करायचे आहे की नाही. मला वाटत नाही की तो तयार होईल, कारण तो तितका वेळ नाही देऊ शकणार. पण त्याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही.'
नेहरा गुजरात टायटन्सचे प्रशिक्षकपद सांभाळताना सामन्यावेळी नेहमीच बाऊंड्री लाईनजवळ सक्रिय दिसतो. त्याच्या मार्गदर्शनात गुजरातने २०२२ मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले होते.
त्यानंतर २०२३ मध्ये त्याच्याच मार्गदर्शनात गुजरात संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता आणि उपविजेता ठरला होता. २०२४ चा हंगाम गुजरातसाठी संघर्षपूर्ण राहिला. पण २०२५ मध्ये त्यांनी चांगले पुनरागमन करत पहिल्या ८ सामन्यांमधील ६ सामने जिंकले आहेत.