Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ला काय असतो हे अगदी जवळून अनुभवलं... पहलगाममधील हल्ल्याचा पुण्याच्या पर्यटकाचा थरारक अनुभव
esakal April 23, 2025 01:45 PM

२०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडला. पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दुपारी सुमारे २.४५ वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये युएई आणि नेपाळमधील दोन पर्यटक, तसेच दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित मृत पर्यटक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशातील आहेत.

शुभम द्विवेदीच्या डोक्यात गोळी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशहून आलेल्या शुभम द्विवेदीचे नाव दहशतवाद्यांनी विचारले आणि त्यानंतर थेट त्याच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. दहशतवादी गोळीबार करत करत निघून गेले. पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट, शोधमोहीम सुरू

हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलीस दलाने भागाला वेढा घातला आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई गस्तही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या काही तासांत प्रशासनाकडून एकच मृत्यू असल्याचं सांगितलं गेलं होतं, मात्र नंतर वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा २७ पर्यंत पोहोचल्याची माहिती दिली.

पुण्याच्या पर्यटकाचा थरारक अनुभव – "जवळून अनुभवलं दहशत"

या हल्ल्याच्या थोड्याच वेळापूर्वी पहलगाममध्ये असलेले पुण्याचे पर्यटक सोहम देशपांडे यांनी सोशल मीडियावरून त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले:

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत भीषण ठरला. पहलगाममध्ये असताना आम्ही एका दहशतवादी हल्ल्याला जवळून अनुभवलं, हे खूपच थरारक आणि हादरवून टाकणारं होतं. काल आमचा मुक्काम याच भागात होता आणि आज दिवसभर आम्ही पहलगाममध्ये फिरत होतो. व्हॅली बघून झाल्यावर आम्ही एका रिव्हर राफ्टिंग पॉईंटजवळ फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. त्याच दरम्यान, जवळच असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार झाला. आम्हाला त्या वेळेस फायरींगचे आवाज ऐकू आले, पण ते नेमके काय आहे हे आम्हाला उमजलं नाही, कारण आम्ही फोटो रील्स तयार करण्यात व्यस्त होतो. हे आवाज फटके वाजल्यासारखे वाटले, कारण रोज कुणाला Gunshot ऐकायला मिळत नाही.

थोड्याच वेळात आम्हाला त्या ठिकाणाहून तातडीने निघण्यास सांगण्यात आलं आणि मगच आम्हाला दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली. सुदैवाने आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत आणि आता हॉटेलवर परतलो आहोत. सध्या परिस्थिती भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते सर्व पर्यटकांना सुरक्षित ठेवतील, याबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही.

देशभरात संताप, सरकारकडून कडक कारवाईची तयारी

या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एनआयए आणि गुप्तचर विभाग सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना निष्फळ करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन

सध्या पहलगामसह खोऱ्यात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सर्व पर्यटकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचं आणि अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हे दहशतीचे थरारक वास्तव समोर आणणारे प्रकरण आहे. सरकार आणि सुरक्षा दलांकडून कारवाई सुरू असली तरी, देशातील नागरिक आणि पर्यटकांनी अत्यंत सतर्क राहणं अत्यावश्यक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.