जुनी सांगवीच्या शिवसृष्टी उद्यानात गर्दी
esakal April 23, 2025 09:45 PM

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी, ता.२३ ः उन्हाळी सुट्यांमुळे जुनी सांगवी येथील स्व. तानाजीराव शितोळे सरकार अर्थात शिवसृष्टी उद्यानात गर्दीने फुलू लागले असून तापमान वाढीमुळे रोज सायंकाळी नागरिक उद्यानात फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. मात्र, तुटकी खेळणी, नादुरुस्त ओपन साहित्य, पाण्याची टंचाई व इमारतीचा रंग उडाल्याने उद्यानाला बकालपणा आला आहे.
शिवसृष्टी उद्यानात चिमुकल्यांसह नागरिकांची बारमाही मोठी गर्दी असते. मात्र दुरवस्थेमुळे नागरिकांना आनंदाऐवजी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या उद्यानात शहरातील पहिले ध्यान धारणा केंद्र व सांस्कृतिक सभागृह आहे. परंतु इमारतीचा रंग उडाल्याने इमारत व आतील सभागृहाच्या भिंतींना बकालपणा आला आहे. ‘मॉडेल वॉर्ड’ संकल्पनेतून महापालिकेच्यावतीने २०११ ला हे उद्यान विकसित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी ‘शिवसृष्टी’ अशी या उद्यानाची ओळख आहे. सध्या अंतर्गत व बाह्य परिसराचे सुशोभीकरण करणे गरजेचे बनले आहे. नागरिक रूपेश पुजारी म्हणाले,‘‘गेल्या आठवड्यापासून पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.’’

तुटकी खेळणी, नादुरुस्त साहित्य
तुटकी व काढून नेलेल्या खेळण्यांच्या जागी शिल्लक राहिलेल्या साहित्याला गोणपाट लावून झाकण्यात आलेले आहे. काही वर्षांपूर्वी तुटलेल्या फायबरच्या घसरगुंडीत एका चिमुकल्याला स्वतःची करंगळी (बोट) गमवावी लागली होती. तुटक्या खेळण्यांपासून चिमुकल्यांना अपघाताचा धोका लक्षात घेऊन येथील दुरुस्ती कामे तातडीने करण्यात यावीत, इमारतीची रंगरंगोटी करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

असे आहे शिवसृष्टी उद्यान...
- सुमारे दोन एकर परिसरात उद्यानाचा विस्तार
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भिंती शिल्पातून साकार
- शहरातील पहिले ध्यान धारणा योग व्यायामाची इमारत
- सध्या इमारतीत हास्य क्लब, योग अभ्यास, महिलांसाठी विविध प्रशिक्षणासह आदी कार्यक्रम


उद्यानाची गरज...
- फायबर म्यूरल्सचे रंग उडणे, तुटण्याचे प्रकार
- मेटल म्यूरल्स बसविण्याची गरज
- ध्यान धारणा केंद्र इमारतीची रंगरंगोटी करणे
- प्रवेशद्वार व चिरेबंदी सीमाभिंतींवर नव्याने आकर्षक विद्युत रोषणाई करणे
- लहान मुलांसाठी जुनी खेळणी काढून नव्याने विविध खेळणी बसविणे
- सभागृहातील दिवे, पंखे, ध्वनीक्षेपक संच नव्याने बसविणे


उद्यानात नियमित देखभाल असते. नागरिकांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांना तोंडी व लेखी कळविण्यात आले आहे.
- राजाराम शिरसाट, उद्यान निरीक्षक, ह प्रभाग

उद्यानातील सर्व दुरुस्ती कामे तत्काळ करण्यात येतील. रंगरंगोटीची काही कामे करण्यात आली आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठांशी व स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल.
- राजश्री सातळीकर, अभियंता (उद्यान व क्रीडा विभाग)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.