श्रीनगर - पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना या घटनेत २६ निष्पाप लोकांचे जीव गेले. यातील बहुतांश जण काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि शांततेचे क्षण अनुभवण्यासाठी आले होते.
या २६ जणात एक धाडसी माणूसही होता, घोडेवाला सय्यद आदिल हुसेन शाह. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारात तो मृत्युमुखी पडला.
ते काश्मीरचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका, अशी आर्त विनवणी करत असतानाही नराधम दहशतवाद्यांनी त्याचे बोलणे ऐकले नाही आणि निर्दयीपणे त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.
सय्यद हा व्यवसायाने तट्टूवाला होता. तो पर्यटकांना तट्टूच्या मदतीने बैसरन व्हॅलीमध्ये फेरी मारुन आणायचा. तो कुटुंबाबातील एकमेव कमावता होता आणि घरही त्याच्याच कमाईवर चालत होते. हल्ल्याच्या दिवशी सय्यद बैसरनमध्येच होता.
मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अचानक बैसरन व्हॅलीत फिरणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला, तेव्हा सय्यद घाबरला नाही. उलट तो त्यांच्याशी भिडला. त्याने दहशतवाद्यांना विनवणी केली, हे काश्मीरचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका. पण दहशतवादी काहीच ऐकायला तयार नव्हते.
तेव्हा सय्यदने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो एकटाच त्या दहशतवाद्यांसमोर उभा राहिला. दहशतवाद्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि क्रूरपणे त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सय्यदचे वडील सांगतात की, तो घोडा घेऊन गेला होता.
आम्हाला दुपारी हल्ल्याची बातमी मिळाली. आम्ही त्याला फोन केला, पण तो बंद होता. काही वेळाने फोन वाजला, पण कोणी उचलला नाही. नंतर ठाण्यात तक्रार केली आणि मग समजले की तो रुग्णालयात आहे. ते सांगतात, सय्यद कुटुंबाचा सगळ्यात मोठा आणि एकटाच कमावणारा मुलगा होता. काश्मीरच्या या सुपुत्राने जे केलं, ते संपूर्ण देश कधीही विसरणार नाही.