स्वप्न ते ध्येय
esakal April 24, 2025 11:45 AM

अश्विनी आपटे- खुर्जेकर - व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न बघत असतं, काही जणांना स्वतःचं घर हवं असतं, काहींना चांगली नोकरी मिळवायची असते, काही महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींना स्वतःचं आरोग्य सुधारायचं असतं. आपली स्वप्नं आपल्याला प्रेरणा देतात; पण ती ध्येयात रूपांतरीत केल्याशिवाय ती फक्त कल्पनेतच राहतात. स्वप्न म्हणजे आपण मनात बाळगलेली इच्छा कल्पना किंवा अपेक्षा. त्यात भावना असते, प्रेरणा असते; पण ठोस कृती योजना नसते. ध्येय म्हणजेच ठरवलेली दिशा जिच्याकडे आपण नियोजन, कृती आणि सातत्याने प्रयत्न करत जातो. ध्येय ही कृतीची सुरुवात आहे. ती वेळ योजना आणि अंमलबजावणीवर आधारित असते.

त्यामुळे मैत्रिणींनो, जोपर्यंत आपण ध्येयाच्या दिशेनं कृती करत नाही, तोपर्यंत ही ध्येय मनातच राहतात. बरेचदा याचे कारण म्हणजे भीती, आत्मविश्वासाचा अभाव, वेळेचं योग्य नियोजन न करणं आणि उद्यापासून सुरुवात करीन या विचारात अडकणं. ध्येय असणं किंवा ठरवणं ही यशाची पहिली पायरी नक्कीच आहे; परंतु नुसतं ध्येय ठरवून किंवा असून उपयोगाचं नाही तर या ध्येयाकडे जाण्यासाठी ठोस पावलं उचलणं महत्त्वाचं आहे.

ध्येय का ठरवावं?

  • आयुष्याला दिशा मिळते

  • प्रगती मोजता येते

  • स्वतःबद्दल स्पष्टता मिळते

  • वेळेचं आणि ऊर्जेचे व्यवस्थापन करता येतं

मैत्रिणींनो, तुम्हाला आयुष्यात काही मोठं साध्य करायचं असेल, तर त्याची स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे; पण ती स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी कृती करणं अत्यावश्यक आहे. ध्येय ठरवताना त्याचं स्वरूप स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे. ‘मला काहीतरी मोठं करायचं आहे’ हे वाक्य अपूर्ण आहे. त्याऐवजी पुढील सहा महिन्यांत मी माझा ऑनलाईन व्यवसाय सुरू करणार आहे, हे अधिक ठोस ध्येय आहे.

हे प्रश्न स्वतःला नक्की विचारा

मैत्रिणींनो, ध्येय ठरवणं म्हणजे स्वप्न पाहणं आहे आणि त्यावरती कृती करणं म्हणजे ते स्वप्न हळूहळू सत्यात उतरवणं आहे. आता या कृतीची सुरुवात कशी कराल? तर दररोज थोडं थोडं पुढे जा, लहान पाऊलं उचला. एक ‘टू डू लिस्ट’ तयार करून ठरावीक कृती ठळकपणे लिहा. तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करा, काय साध्य केलं याची नोंद करा. प्रत्येक छोटी यशं साजरी करा आणि स्वतःला प्रोत्साहित करा.

कृती करताना झालेल्या चुका स्वीकारा आणि लक्षात ठेवा, की चुका हे शिकण्याचं एक साधन आहे.

मैत्रिणींनो, स्वप्नं आपल्या मनाला ऊर्जा आणि आयुष्याला दिशा देतात. मात्र, ती केवळ कल्पनांमध्येच राहिली, तर अपूर्ण ठरतात. त्यांना वास्तवात उतरवण्यासाठी, त्यांचं रूपांतर ध्येयात करणं गरजेचं आहे. ध्येय म्हणजे आपल्या स्वप्नांना दिलेली दिशा, कृतीची रूपरेषा आणि यशाच्या दिशेनं केलेली वाटचाल. जेव्हा आपण SMART पद्धतीनं ध्येय ठरवतो आणि सातत्यानं प्रयत्न करतो, तेव्हाच ते ध्येय आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातं.

स्वप्नं पाहा; पण झोपेत नाही – उघड्या डोळ्यांनी, कृतीसह. ध्येय ठरवा, योजना करा आणि न थकता प्रयत्न करत राहा - यश तुमच्या पावलांखाली झुकलंच पाहिजे. ‘तुमचं यश केवळ स्वप्नांवर नव्हे, तर त्यासाठी घेतलेल्या कृतींवर अवलंबून आहे.’ चला तर मग, आजचं एक स्वप्न, उद्याचं ध्येय ठरवूया.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.