मादाम भिकाजी कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील देशातील मोठे उद्योगपती होते. मादाम कामा यांना इंग्रजी भाषेबरोबरच अनेक भाषांचे ज्ञान होते. 1885 मध्ये एका पारशी समाजसुधारकांच्या कुटुंबामध्ये रुस्तमजी कामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. रुस्तमजी कामा हे उच्चशिक्षित तर होतेच पण सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने वकील होते. रुस्तमजी यांच्या मते, भारताचा विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा भारतीय ब्रिटीशांच्या विचारप्रणालीनुसार विचार करतील. याविरूद्ध मत मादाम कामा यांचे होते.
सन 1896 मध्ये मुंबईमध्ये सर्वत्र भयंकर अशी प्लेगची साथ पसरली. अशावेळी भिकाजी कामांनी परिचारिका बनून रोग्यांची सेवा शुश्रूषा केली. पण दुर्दैव हे की रोग्यांची सेवा करता करता त्या स्वतःच प्लेगची शिकार बनल्या. त्यामुळेच स्वतःवर योग्य ते इलाज करून घेण्यासाठी त्या युरोपला गेल्या. 1906 साली त्या लंडनला पोहोचल्या.
लंडनमध्ये असतानाच दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. त्यांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषत: देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. सावरकरांचे’ १८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठीही त्यांनी मदत केली.
1907 साली जर्मनीतल्या स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत ज्या ज्या देशातून लोक आले होते त्या त्या देशाचा झेंडा लावण्यात आला होता. परंतु भारताचा ध्वज म्हणून. ब्रिटीशांचा झेंडा लावण्यात आला होता. मादाम कामांना ही गोष्ट मान्य नव्हती म्हणून त्यांनी एक नवीन झेंडा बनविला व भारतीय ध्वज म्हणून तो झेंडा त्यांनी परिषदेत लावला.
वयाच्या 74 व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. 19ऑगस्ट, इ.स. 1936 या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा : चार धाम: या तीर्थक्षेत्र शिवाहाचे चार्दहम यात्रा अपूर्ण
संपादित – तनवी गुडे