डोंबिवली : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीतील तिघांसह महाराष्ट्रातील एकूण सहाजणांचा समावेश आहे. दरम्यान, डोंबिवलीतील तीन निष्पाप नागरिकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज (24 एप्रिल) डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी शहर बंदची हाक दिली. या बंदला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. अशातच दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या डोंबिवलीच्या कुटुंबीयांनी आपली आपबिती सांगितली. (Mone Joshi and Lele families from Dombivli who survived the Pahalgam attack share their ordeal)
अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी सांगितले की, आम्ही दुपारी 1.30 सुमारास तिथे पोहचलो. तिथे पर्यटकांची खूप गर्दी होती. आम्ही सर्व आनंदी होतो. ऊन खूप असल्यामुळे आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं काही खाण्यासाठी एका स्टॉलवर गेलो. आमचं तिथे खाऊन झाल्यावर आम्हाला शुटींगचा आवाज आला. आम्हाला सुरुवातीला वाटलं की, पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी गेम्स असतील, असं समजून आम्ही लक्ष दिलं नाही. पण नंतर अचानक फायरिंग चालू झाली आणि सगळीकडे गोंधळ उडाला. तिथे उपस्थित सगळेच लोक घाबरले. आम्ही सगळे खाली झोपलो.
हेही वाचा – Pahalgam Attack : कपाळाच्या टिकल्या काढल्या, अल्लाहू अकबर म्हटले, पण..; गणबोटेंच्या पत्नीने सांगितला थरार
अनुष्का मोने म्हणाल्या की, दहशतवादी आमच्याजवळ आल्यावर माझे पती त्यांना म्हणाले की, आम्हाला गोळ्या मारू नका. पण दहशतवाद्यांनी आम्हाला विचारलं तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण? आमच्यापैकी कोणीही त्यांना उत्तर दिलं नाही. आम्ही कोणीही तिथून वेगळे झालो नाही. पण आमच्यातील एकजण दहशतवाद्यांना बोलला तुम्ही असे का करत आहात? आम्ही काय केलं आहे? पण दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्यावेळी माझे पती म्हणाले की, गोळ्या घालू नका. आम्ही काहीही करत नाही. आम्ही इथेच बसून राहतो. पण माझे पती बोलत असतानाच दहशतवाद्यांनी त्यांनाही गोळ्या घातल्या.
अनुष्का मोने म्हणाल्या की, दहशतवाद्यांनी पुन्हा विचारले हिंदू कोण आहे? त्यावेळी माझ्या जिजूने हात वर केला आणि दहशतवाद्यांनी त्यांनाही गोळ्या घातल्या. आमच्या घरातले कर्ते पुरुष होते आणि आम्ही त्यांना वाचविण्यासाठी काहीही करू शकलो नाही. दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी अशा बऱ्याच जणांना तिथे मारलं. दहशतवादी तिथून निघून गेल्यानंतर आम्ही माझ्या पतीसह गोळ्या लागलेल्या सर्वांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. दहशतवादी आम्हाला म्हणाले होते की, तुम्ही या ठिकाणी दहशत माजवली आहे. पण पर्यटकांनी तिथे नेमकं काय केलं? हे मला तरी आतापर्यंत समजलं नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी अनुष्का मोने यांनी यावेळी केली.
हेही वाचा – Pahalgam Attack : कधीकाळी तुम्हीच विचारलेले प्रश्न…, व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारेंचे मोदींवर शरसंधान