पहलगाम हल्ला
esakal April 24, 2025 08:45 PM

पहलगाममधील हल्ल्याचा निषेध
रोह्यातील हिंदू संघटनांकडून मृतांना श्रद्धांजली

रोहा, ता. २४ (बातमीदार) ः शहरातील श्रीराम मारुती चौकात धर्मरक्षक हिंदू सेना, रोहा सकल हिंदू समाजातर्फे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पहलगाम येथे देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना घडली असून या वेळी दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून निर्घृण हत्या केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश आहे. देशभरात विविध ठिकाणी हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत मृतांना श्रद्धांजली वाहिली जात असून हल्ल्याचे पडसाद रोहे शहरातही उमटले आहेत. रोहे शहरात धर्मरक्षक हिंदू सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल हिंदू समाजबांधव व भगिनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता एकवटले. या वेळी देशहितार्थ घोषणा देत हल्ल्याचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी धर्मरक्षक हिंदू सेनेचे अध्यक्ष तुषार मोरे, अशोक निमक, जयेश छेडा, दिलीप वर्मा, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, ललित गुजर, माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर, सुभाष राजे, बापू जोशी, अरुंधी पेंडसे, माजी नगरसेवक अजित मोरे, प्रल्हाद भाटे, निर्मला भूतकार, यज्ञेश भांड, विनायक पाटील आदी उपस्थित होते.
सतत घडणाऱ्या देशविरोधी घटनांबाबत सरकारने योग्य ती पावले उचलून कायमचा बंदोबस्त करावा, तसेच जे देशविरोधी कार्यवाह्यांना खतपाणी घालतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व भविष्याच्या दृष्टीने देशहितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मान्यवरांनी या वेळी केले.

रोहा : हिंदू संघटनेकडून शहरात निषेध व्यक्त करण्यात आला.

----------

पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) ः जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तानी संघटनेकडून भ्याड हल्ला करण्यात आला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना श्रीवर्धन संघटनेकडून निषेध करण्यात आला. या वेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या अठ्ठावीस पर्यटकांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.


---------------


माणगावात मेणबत्ती पेटवून मोर्चा

माणगाव, ता. २४ (बातमीदार) ः काश्मीरमध्ये दहशतवादाने पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी फक्त धर्म विचारून केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत. बुधवारी (ता. २३) शहरात मेणबत्ती मोर्चा काढत निषेध करण्यात आला. या वेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मेणबत्ती मोर्चाला माणगाव नगर पंचायत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक अजित तार्लेकर, ॲड. अनिकेत ठाकूर, श्रीरामनवमी उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते. माणगाव बाजारपेठेतील कचेरी रोड कॉर्नर ते वीर यशवंतराव घाडगे स्मारक असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या वेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करीत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

--------------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.