काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. पर्यटनासाठी आलेल्या हिंदू नागरिकांना लक्ष्य करून गोळ्या झाडल्या. त्यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध राग आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानला लवकरच धडा शिकवू असा इशारा दिला आहे. असं असताना पाकिस्तानातूनही असाच आवाज उचलला जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपल्याच देशाची पोलखोल केली आहे. क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितलं की, हिंदू असल्याने पाकिस्तानात वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने वारंवार या घटनेचा निषेध केला आहे. इतकंच काय तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पाकिस्तानचा या हल्ल्यात कोणताही हस्तक्षेप नव्हता तर याप्रकरणी निषेध का नोंदवला नाही?
दानिश कनेरियाने सोशल मीडियावर एका पाकिस्तान युजर्सचं तोंड बंद करत लिहिलं की, हिंदू असल्या कारणाने असाच निशाणा साधला गेला, जसं की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदू असल्याने मारलं. दानिशने एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, ‘मी पाकिस्तान किंवा लोकांविरुद्ध बोलत नाही. मी पण एकदा अभिमानाने पाकिस्तानची जर्सी परिधान केली होती. मी सुद्धा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळला आहे. पण माझा शेवटही पहलगाम हल्ल्यातील पीडितांसारखाच झाला. फक्त हिंदू असल्याने टार्गेट केलं गेलं.’
22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या नागरिकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केलं. गोळ्या झाडण्यापूर्वी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारला. पीडित नागरिकांनी याचा खुलासा मीडियासमोर केला आहे. हिंदू असल्याचं कळताच निर्घृणपणे बायका मुलांसमोर हत्या केली. या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला.