कळवा परिसरात आज पाणी बंद
कळवा, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काटई नाका ते ठाणे यादरम्यान गुरुवारी (ता. २४) रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २५) रात्री बारापर्यंत एकूण २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१चा काही भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांत, ठाण्यातील वागळे प्रभाग समितीतील रूपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. तसेच, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.