पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड उद्योगनगरीलगत तीर्थक्षेत्र देहू, देहूरोड कॅन्टोमेन्मेंट बोर्ड आणि आयटीनगरी हिंजवडी आहे. या तीनही ठिकाणी सरसकट प्रतिजोडणी प्रतिमहिनाप्रमाणे वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. देहू व हिंजवडीत अडीचशे रुपये म्हणजेच वर्षाला तीन हजार रुपये; तर देहूरोडला वार्षिक तीन हजार ३०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी स्वस्तात मिळत आहे. प्रतिसदनिका व प्रतिझोपडी प्रतिमहिना सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत आहे. त्यापेक्षा अधिक पाणी वापरल्यास सदनिकांसाठी किमान पाच रुपये ६२ पैसे आणि झोपडीसाठी केवळ दोन रुपये ७९ पैसे प्रतिहजार लिटरसाठी आकारले जातात.
पिंपरी चिंचवडसाठी पाण्याचे नियोजन महापालिका करते; तर हिंजवडीसाठी ग्रामपंचायत, देहूरोडला कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहूला नगरपंचायत पाण्याचे नियोजन करते. पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक नळजोडाला पाणीमीटर बसविले आहेत. त्यामुळे वापरानुसार शुल्क आकारले जाते. मात्र, दरमहा पहिल्या सहा हजार लिटर पाण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यापुढील वापरासाठी शुल्क आकारले जात आहे. तर शहरालगतच्या देहू, देहूरोड आणि हिंजवडीमध्ये सरसकट मासिक शुल्कानुसार वार्षिक पाणीपट्टी आकारणी केली जाते.
पिंपरी चिंचवडमध्ये प्रतिव्यक्ती प्रतिदिन १३५ लिटर पाण्याची गरज निर्धारित केली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन केले आहे. शिवाय, समन्याय पद्धतीने पाणी वितरण व्हावे, सर्व भागांत पुरेशा प्रमाणात व पुरेसे पाणी मिळावे, यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी अवघा एक पैसा लिटर
पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीला प्रतिदिन १३५ लिटर पाणी निश्चित आहे. एका घरात किमान चार जण राहतात, असे गृहित धरल्यास दिवसाला ५४० लिटर पाणी लागते. तीस दिवस म्हणजे एक महिन्याला १६ हजार २०० लिटर पाणी लागेल. सदनिकांच्या दरानुसार, प्रतिमहिना सहा हजारपासून २२ हजार ५०० लिटरपर्यंत पाणी वापरल्यास पाच रुपये ६२ पैसे प्रतिहजार लिटरसाठी आकारले जाते. शिवाय, पहिले सहा हजार लिटर मोफत पाणी असेल. म्हणजेच केवळ १० हजार २०० लिटरसाठी पाच रुपये ६२ पैसे प्रतिहजार लिटरसाठी शुल्क आकारले जाईल. ते केवळ ५७ रुपये ३२ पैसे प्रतिमहिना या प्रमाणे एक वर्षाचे शुल्क ६८७ रुपये ८८ पैसे होईल. म्हणजेच केवळ प्रतिहजार लिटरसाठी १० रुपये २० पैसे पाणीपट्टी आकारली जाईल. अर्थात एक लिटर पाणी केवळ एक पैशाला मिळत आहे.
महापालिका ठरावानुसार वार्षिक ५ टक्के वाढ
महापालिका सर्वसाधारण सभेच्या २८ फेब्रुवारी व २० एप्रिल २०१८ च्या ठरावानुसार, महापालिका पाणीपट्टीचे दर टप्प्याटप्प्याने प्रतिवर्षी वाढविण्यास व त्यानुसार दरवर्षी अशा सर्व प्रकारच्या दरांमध्ये वार्षिक पाच टक्के दरवाढ केली जात आहे. त्यानुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे दर एक एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत.
प्रतिसदनिका प्रतिमहिना पाणी वापराचे दर (रुपयांत)
प्रतिमहा लिटर / प्रतिहजार लिटर
१-६००० / ०.००
६००१-२२,५०० / ५.६२
२२,५०१-३०,००० / ११.२६
३०,००१ पेक्षा जास्त / १७.०४
झोपडपट्टीतील प्रतिमहा पाणी वापर दर (रुपयांत)
प्रतिमहा लिटर / प्रतिहजार लिटर
१-६००० / ०.००
६००१-१५,००० / २.७९
१५,१०१-२२,५०० / ४.२१
२२,५०१-३०,००० / ११.२५
३०,००१ पेक्षा जास्त / १६.८७
- व्यावसायिक व अन्य पाणी दर (रुपयांत)
- व्यापारी वापर (हॉटेल्स, दुकाने) ः ७०.३५
- शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय-निमशासकीय कार्यालये, रेल्वे स्थानके, रुग्णालये ः २१
- धार्मिक स्थळे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, धर्मादाय मंडळे ः १३.९९
- स्टेडियम ः २७.९९
- महापालिका इमारती ः १३.९९