चर्चगेट स्थानकाबाहेर उघड्यावर जाळल्या जुन्या नोंदवह्या; पालिकेनेआरपीएफला केला हजार रुपयांचा दंड
Marathi April 24, 2025 12:33 PM

चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ उघडय़ावर जुन्या नोंदवह्या जाळून प्रदूषण करणाऱ्या रेल्वेच्या सुरक्षा दलावर मुंबई महापालिकेने कारवाई करत त्यांना हजार रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली.

मुंबईत उघडय़ावर कचरा जाळून वायू प्रदूषणात भर घालणाऱ्यांविरोधात महापालिका कारवाई करत आहे. उघडय़ावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. चर्चगेट स्थानकाजवळ 3 एप्रिलला आरपीएफच्या जवानांनी उघडय़ावर जुन्या नोंदवह्या जाळल्या. याची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ तिथे जात ही आग विझवली. यावेळी आरपीएफचे कर्मचारीही उपस्थित होते.

महापालिकेने आरपीएफला पाठवले पत्र

महापालिकेने आरपीएफच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे. पत्रात म्हटले, मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य नियमावली 2006 नुसार, आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर कारवाई करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. भविष्यात अशी घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच जुने साहित्य या परिसरातून वेळीच हटवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. दरम्यान, 4 नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत उघडय़ावर कचरा जाळण्याच्या 531 घटना घडल्या असून त्यांच्यावर कारवाई करत आतापर्यंत दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.