(Pahalgam Attack) मुंबई : दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, आता पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sushma Andhare criticizes Modi while sharing an old video)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडियावर एका व्हिडीओसोबत पोस्ट शेअर केली आहे. भारतीय म्हणून आम्ही या लढ्यात एकजुटीने उभे आहोत. पण, कधीकाळी तुम्हीच विचारलेले हे प्रश्न आहेत. आता तुम्हीच खुर्चीत आहात, तेव्हा या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी तुमची आहे! सांगा मोदीजी उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम झाल्यानंतरही हे प्रश्न विचारायचे नाहीत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
पंतप्रधानपदावर विराजमान होण्यापूर्वी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी भारतातील दहशतवादी कारवायांवरून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. दहशतवादी घुसखोरी करून भारतात येतात, दहशतवादी कृत्य करून पळून जातात. सर्व सुरक्षा व्यवस्था तुमच्या हाताता असताना हे दहशतवादी भारतात कसे घुसतात? तसेच हे दहशतवादी आणि नक्षलवादी यांच्याकडे शस्त्रास्त्रे तसेच स्फोटके कुठून येतात? ते परदेशातून येतात आणि देशाची सीमा तर तुमच्या ताब्यात आहे! दहशतवाद्यांना पैसा पुरवला जातो, तो हवालाच्या माध्यमातून येतो. संपू्र्ण आर्थिक व्यवहार भारत सरकारच्या ताब्यात आहे. आरबीआयच्या माध्यमातून होतो. हा विदेशातून दहशतवाद्यांकडे पाठवला जातो. तुमच्या हातात असून तो पैसा तुम्ही का रोखू शकत नाहीत? असे काही प्रश्न त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना विचारले असल्याचे या व्हिडीओत दिसते.
पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याता 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला आहे. धक्कादायक म्हणजे पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच आज काश्मीरमधून तब्बल 1500 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमधून सुमारे 250 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचाही शोध तपास यंत्रणा घेत आहे. यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : संपूर्ण देशातच धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यावर…, ठाकरेंचा मोदींवर निशाणा